बुलडाणा आगाराच्या काही बसफेऱ्या ठरावीक मार्गांवर चालू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसटी हळूहळू रुळावर येत आहे. बुलडाणा आगारातून २० बसफेऱ्या चालू आहेत. प्रवासी संख्या वाढत असल्याने कोरोना नियमांचे पालन व्हावे, म्हणून आगाराने बसफेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. मेहकर, मलकापूर, चिखली ह्या बसेस सध्या सुरू आहेत. एसटी बसेस या दररोज सॅनिटाइझ करून मार्गस्थ केल्या जातात. एसटी प्रशासनाकडून प्रवाशांना मास्क, तसेच सामाजिक अंतर पाळून बसण्याचे आवाहन केले जाते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका कमी होत आहे. लॉकडाऊनमुळे बसफेऱ्या बंद असल्याने एसटीला दीड महिन्यात मोठा तोटा सहन करावा लागला. एसटी बसफेऱ्या चालू झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अजूनही भीतीचे वातावरण आहे.
बुलडाणा आगारातील एकूण बसेस - १००
सध्या सुरू असलेल्या बसेस - २०
एकूण कर्मचारी - ३१०
वाहक - १७२
चालक - १४४
सध्या कामावर वाहक - २६
सध्या कामावर चालक - २६
सर्वाधिक वाहतूक मलकापूर मार्गावर
बुलडाणा आगाराच्या एसटीची सर्वाधिक वाहतूक मलकापूर आणि मेहकर मार्गावर होते.
सरकारी कर्मचारी तसेच इतर प्रवाशांची संख्या या मार्गावर जास्त असल्याने या आगाराच्या सर्वात जास्त बसेस मलकापूर, मेहकर मार्गावर चालू आहेत.
बुलडाणा आगारातून सुरू केलेल्या २६ पैकी जास्त बसेस ह्या याच मार्गावर धावत आहेत. अद्याप लांबपल्ल्याच्या बसेस सुरू झाल्या नाहीत.
बसेस केल्या जातात सॅनिटाईझ
आगारातून बसस्थानकावर बस उभी करण्यापूर्वी ती बस सॅनिटाईढ केली जाते. प्रवाशांनी मास्क न लावल्यास त्यांना बसमध्ये प्रवेश दिला जात नाही. चालक, वाहक हेसुद्धा मास्कचा वापर करतात. बुलडाणा बसस्थानकात बस आल्यानंतर लगेच बसचे निर्जंतुकीकरण केले जात आहे.
दीड महिन्यांत चार कोटींचा तोटा
बुलडाणा आगारातील एसटीला गेल्या दीड महिन्यात चार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. सध्या दिवसाला २० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न बुलडाणा आगाराला येत आहे. हळूहळू यात वाढ होण्याचे संकेत दिसून येत आहेत.
प्रवासी घरातच...
एसटी काही प्रमाणात सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांचा प्रतिसाद कमी प्रमाणात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले आहे. ग्रामीण भागातील काही नागरिक शहरात येण्यासाठी एसटीचा वापर करत आहेत.
बस सुरू झाली अन् जीवात जीव आला
एसटी रुळावर आल्याने समाधान वाटत आहे. लवकरात लवकर कोरोनाचे संकट दूर होऊन एसटीच्या सर्व फेऱ्या चालू व्हाव्यात, हीच अपेक्षा. प्रवाशांना बसमध्ये बसल्यावर मास्क, सॅनिटायझर वापरण्यास सांगतो. प्रवाशांनी योग्य काळजी घ्यावी.
- चालक
कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत आम्ही काम करीत आहोत. आम्हांला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यापुढे फ्रंटलाइन वर्करमध्ये कर्मचाऱ्यांचा समावेश करून लवकरात लवकर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे.
- वाहक