बुलडाणा : विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील कोषागार कर्मचाऱ्यांनी ३ मे रोजी सामूहिक रजेचे हत्यार उपसले. दोन दिवस म्हणजे ३ व ४ मे पर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे. पर्यायाने शासकीय बिले, कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर कामे खोळंबणार आहेत.
लेखा व कोषागार कर्मचारी संघटना बुलडाणा (वर्ग ३) च्या पदाधिकारी व सदस्यांनी सकाळी जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयासमोर संघटना जिंदाबाद, आमच्या मागण्या मान्य करा आदी घोषणा देऊन शासनाचे लक्ष वेधले. कंत्राटी पदभरती रद्द करुन नियमित पदभरती करावी व बिंदू नियमावली नियमित करावी, २००८ नंतर रुजू झालेल्या लेखा लिपिकांच्या उपकोषागार अधिकारीपदी पदोन्नतीसाठी ३ वर्षांची वरिष्ठ लिपिकाची सेवा रद्द करावी, उप लेखापाल पदावरुन सहायक लेखाधिकारी पदावर २० टक्केचा पदोन्नती कोटा वाढवून ५० टक्के करावा, लेखा लिपिकांचे ग्रेड वेतन १९०० रुपयांवरुन २४०० रुपये करावे तर वरिष्ठ लिपिकांचे ग्रेड वेतन २८०० वरुन ३५०० रुपये करावे यासह इतर मागण्यांसाठी सामूहिक रजेचे हत्यार उपसण्यात आले आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मोहोळ यांच्या नेतृत्वात गुरुवारी सकाळी सामूहिक रजा आंदोलन सुुरु करण्यात आले. यावेळी पंकज गवई, राहुल निखारे, शाम जाधव, वंदना राखुंडे, नारायण गिते, योगेश भोंडे, राहुल भोलाने, संदीप राजपूत, महेश सातव, नारायण मानमोडे, मंगलसिंग राजपूत, दिलीप सोळंकी, प्रशांत गाडगे, सचिन देशमुख, योगेश येरंडे, सविता आढाव, दीपाली वानखेडे, तृप्ती सरोदे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
संपामुळे खोळंबणार कामे
जिल्हा कोषगार अधिकारी कार्यालयासह तालुक्याच्या ठिकाणी उपकोषागार अधिकारी कार्यालय आहेत. या कार्यालयांच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांचे बिले, निवृत्ती वेतनधारकांची पेन्शन, मुद्रांक विक्री, शासकीय चलन भरणा, सर्व राज्य शासकीय कर्मचाºयांचे वेतन यासह इतर कामे चालतात. कोषागार कार्यालयाचे जिल्ह्यातील जवळपास ४९ कर्मचारी दोन दिवस संपावर असल्यामुळे उपरोक्त कामे खोळंबणार असून नागरिकांना गैरसोय सहन करावी लागणार आहे.