नवजात बालकांच्या जीवनातील सुरुवातीचे हजार दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. पहिल्या दोन वर्षांत बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ होत असते. या कालावधीत त्यांचे आरोग्य व पोषणाकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात मोठे दुष्परिणाम होऊ शकतात.
त्यामुळे वयाच्या मानाने उंची, उंचीच्या मानाने वजन योग्य असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शासन स्तरावरून प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय कुपोषणमुक्तीसाठी २००५ मध्ये स्थापन झालेल्या राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनमार्फत माता सक्षमीकरणाची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
कुपोषण निर्मूलनाकरिता ग्राम बालविकास केंद्र हा उत्तम पर्याय ठरत असून याअंतर्गत सॅम व मॅम या घटकांत मोडणाऱ्या बालकांवर उपचार केले जात आहेत. त्या अनुषंगाने १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत ‘सॅम’ घटकातील ३०० च्या आसपास बालके दाखल झाली होती. त्या सर्वांवर उपचार करण्यात आले असून त्यातील निम्म्या बालकांच्या प्रकृतीत पूर्णत: सुधारणा झाली. मागील वर्षी कोरोनाच्या काळात ३१० बालके अतितीव्र कुपोषित (सॅम) आढळून आली होती. एप्रिलमध्ये ही कुपोषित बालके आढळून आल्यानंतर त्यांच्यावर योग्य उपचार करून खबरदारी घेण्यात आली होती. २०१९ पेक्षा २०२० मध्ये १४२ ने वाढ झाल्याचे दिसून आले होते.
कुपोषणमुक्तीसाठी प्रशासनाकडून सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. मुले सुदृढ राहावी, यासाठी मातांमध्ये सातत्याने जनजागृती केली जात आहे. त्यामुळेच अनेक बालकांना पूर्णत: बरे करण्यात यश मिळाले असून यापुढेही कुपोषणमुक्तीच्या कार्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आली आहे. कुपोषित बालकांना घरपोच पोषण आहारही देण्यात आला.
वर्षभरामध्ये २०६ बालकांची तीव्र कुपोषणावर मात
जिल्ह्यात २०२० मध्ये तीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण वाढले होते. १७७ वरून ३१० वर हा आकडा पोहचला होता. त्यांच्यावर टप्प्याटप्प्याने उपचार करीत बालकांना कुपोषणमुक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरामध्ये २०६ बालकांनी तीव्र कुपोषणावर मात केली आहे. सॅम (तीव्र कुपोषित) गटामध्ये मागील वर्षी ३१० बालके होती. त्याचे प्रमाण आता कमी झाले असून सध्या १०४ बालके आहेत.