- नवीन मोदे
धामणगाव बढे : स्वकीयाचा मृत्यू म्हणजे मनाला चटका लावणारी गोष्ट. परंतु, मृत्यू हेच जीवनाचे अंतीम सत्य आहे. अशाच दुखाच्या प्रसंगी पिंप्रीगवळी येथील उबाळे कुटुंबियांनी वडिलांच्या मृत्यूनंतर रूढी परिवर्तनाचा सामाजिक संदेश देत पर्यावरणपुरक अस्थी व रक्षाविसर्जन करीत त्याठिकाणी वटवृक्षाचे रोपटे लावले. त्यांच्या या कृतीचे समाजातील मान्यवरांनी कौतूक केले.पिंप्रीगवळी येथील पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी कडूबा नारायण उबाळे (८४) यांचे २१ मे रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. आयुष्यभर त्यांनी वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेतला. त्यासाठी शेतात; तसेच घराच्या परिसरात अनेक झाडांचे संगोपन केले. २३ मे रोजी पिंप्रीगवळी येथे त्यांच्या अस्थी व रक्षा विसर्जनाचा (सावडण्याचा) विधी पार पडला. परंतु, वेगळ्या पध्दतीने त्यासाठी अस्थी व रक्षा विसर्जन नदीपात्रात न करता शेतामध्ये एका खडड्यात करण्यात आले व त्याठिकाणी समाजातील मान्यवरांचेहस्ते वटवृक्षाचे रोपटे लावण्यात आले. घरातील प्रिय व्यक्ती मृत्यूनंतरसुध्दा कधीही विस्मरणात जाऊ नये व शेवटच्या विधीमध्येसुध्दा पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी उबाळे कुटुंबीयांनी प्रत्यक्ष कृतीतून राबविलेली संकल्पना प्रेरणादायी आहे. त्याचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत झाले. त्यासोबत वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी आणखी २५ वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार कडुबा उबाळे यांचे पुत्र मारोती उबाळे यांनी केला. सर्वप्रथम जलसंपदा विभागात काम करणाºया स्व.कडुबा उबाळे यांचे नातु अंकीत चौथनकर यांनी ही संकल्पना मांडली व कुटुंबियांनी त्यास पाठबळ दिले. समाज परिवर्तनासाठी दिशादर्शक ठरणाºया या रक्षाविसर्जन कार्यक्रमाला दलितमित्र माधवराव हुडेकर, माजी आमदार सखाराम अहेर गुरूजी, डॉ. शिवशंकर गोरे, शिवसेना तालुका प्रमुख रामदास चौथनकर, विष्णु उबाळे, गणपतराव अहेर, गजानन हुडेकर, सरोदे, अंबादास धोंगडे, बहुसंख्य समाज बांधव तथा मित्र, आप्तेष्ट उपस्थित होते.
परिवर्तनवादी विचारांची आज समाजाला गरज आहे. पिंप्रीगवळी येथील उबाळे कुटुंबियांचा आदर्श अनुकरणीय आहे. वृक्षसंवर्धनातून प्रिय व्यक्तीच्या स्मृतीचे जतन ही लोकचळवळ बनावी यासाठी प्रयत्न करू.-डॉ.शिवशंकर गोरेसावता मंडळ, बुलडाणा