लोकमत न्यूज नेटवर्क
गोहोगाव दांदडे: मेहकर तालुक्यातील गोहोगाव दांदडे परिसरात गत काही दिवसांपासून अवैध वृक्षतोड केली जात आहे. याकडे वन विभागासह संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
वृक्षसंवर्धनासाठी शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते. त्याचवेळी वृक्ष संवर्धनावरही कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो; मात्र अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे वृक्ष लागवड योजना ही एक फार्स ठरत आहे. दरम्यान, गोहोगाव दांदडे परिसरातील पांगरखेड ते डोणगाव मार्गे वृक्षांची कटाई केल्यानंतर ट्रॅक्टरद्वारे या लाकडांची वाहतूक केली जात आहे. वृक्षतोडीसाठी मशीनचा वापर होत असल्याने कमी वेळात मोठ्या लाकडांची कटई होत आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ºऱ्हास होत असल्याने परिसरातील वृक्षतोडीला आळा घालण्याची मागणी गोहोगाव परिसरातील वृक्षप्रेमींनी केली आहे.