लोकमत न्यूज नेटवर्ककाशिनाथ मेहेत्रे/सिंदखेडराजा : शासनाने येत्या तीन वर्षामध्ये वनविभागासह शासनाच्या एकूण तेहतीस विभागामार्फत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट निश्चीत केले आहे. यावर्षी चार कोटी वृक्ष लागवड करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली. तर दुसरीकडे वनविभागाच्या व इतर खात्याच्या आशिर्वादाने वृक्षतोड माफीयांनी हैदोस घातला असून, अनेक झाडांची मशिनीद्वारे कटाई करण्यात येत आहे.बेसुमार अवैध वृक्षतोड करण्याला वनविभागासह संबंधित खात्याचे अधिकारी जबाबदार आहे. माफीयांना वृक्ष तोड करताना अधिकारी, कर्मचारी वैयक्तीक लाभापोटी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करतात. ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये वृक्षतोड होत आहे, अशा लोकांवर कडक कार्यवाही करण्यात यावी, अशी वृक्ष पे्रमींची मागणी आहे. वाढत चाललेले तापमान, अनियमीत पडणारा पाऊस, दुष्काळ, पाण्याची भिषण टंचाई, यावर उपाय करण्यासाठी महाराष्ट्र शासन वृक्ष लागवडीवर करोडो रुपये खर्च करीत आहे. तर दरवर्षी पावसाळा सुरु झाला की, वृक्षलागवड करणारे असंख्य लोक वर्तमान पत्रात फोटो छापून येण्यापुरता कार्यक्रम राबवतात. दरवर्षी त्याच गड्डयामध्ये नवीन रोप लावल्या जाते, फक्त लावणारे बदलतात. लावलेली किती वृक्ष जगली याचा मात्र ताळमेळ नाही. शेतकरी आर्थिक संकटामध्ये आहे. घरप्रपंच चालविण्यासाठी, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे पैसाच उरला नाही. विकण्यासाठी कोणताच शेतमाल शिल्लक नसल्यामुळे गोठ्यातील गाई, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या विकून आजपर्यंत तग धरुन असलेला बळीराजा शेतात शेताच्या बंधाऱ्यावर असलेले बाप-दादापासून सांभाळ केलेली निंबाची, आंब्याची, चिंच, बोर, साग, जांभुळ, बाभळीची मोठमोठी झाडे मातीमोल किंमतीमध्ये वृक्षतोड माफीयांना विकत आहेत. त्याला वनविभागाचे व संबंधित खात्याचे अधिकारी कर्मचरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आर्थिक तडजोड करुन वृक्षतोडीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करताना दिसत आहे. सध्या वनविभागाच्या जंगलात निंबाची कटाई केलेली मोठमोठी वृक्ष याची साक्ष देतांना दिसत आहे.
वनविभागाच्या आशिर्वादाने वृक्षतोड जोमात
By admin | Published: June 30, 2017 8:29 PM