लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा व त्यामधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या वस्तू ऐवजी आता त्यांच्या खात्यात त्या वस्तूंची रक्कम अदा केली जाणार आहे. त्यामुळे अनेक वस्तूंची पुरवठादाराकडून खरेदीही थांबवण्यात आली आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनेनुसार वस्तू पुरवठा आणि लाभाच्या वस्तू बाबतचे धोरण शासनाने ३० डिसेंबर रोजी ठरवले आहे. त्यामध्ये आता विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाकडून दिल्या जाणाऱ्या वस्तूंची रक्कम विद्यार्थी व पालकांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना १६ प्रकारच्या वस्तूंचा पुरवठा शासनाकडून केला जातो. त्यामध्ये रेनकोट, छत्री, नाइट ड्रेस, वुलन स्वेटर, अंडर गारमेंट, सँडल, स्लीपर, बुट, पायमोजे, कंगवा, नेलकटर, आंघोळीचा साबण, कपडे धुण्याचा साबण, डिटर्जंट पावडर, खोबरेल तेल, टुथपेस्ट, टुथब्रश, सँनेटरी नँपकीन, मुलींसाठी रिबन, टाँवेल, सर्व प्रकारचे शालेय साहित्य, स्टेशनरी, लेखन सामुग्री, सराव प्रश्नसंच, गणवेश, पीटी ड्रेस, पीटी शूज, साँक्स या वस्तूंचा समावेश आहे. तसेच शाळांसाठी आवश्यक वस्तूची खरेदी उद्योग विभागाच्या निर्देशानुसार करण्याचे आदिवासी विकास विभागाने पत्रात म्हटले आहे. येत्या काळात या निर्णयाची आदिवासी विभागाकडून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
आदिवासी विद्यार्थ्यांना १६ प्रकारच्या वस्तूंऐवजी मिळणार रोख रक्कम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 12:14 PM