जयदेव वानखडे / जळगाव जामोद (बुलडाणा):सातपुडा पर्वताच्या रांगेत उंच ठिकाणावर वसलेलं १५00 लोकवस्तीचं आदिवासी ग्राम भिंगारा एक नैसर्गिक सौंदर्याचं लेणं आहे. निसर्गाने मुक्तहस्तपणे उधळलेलं येथील पर्यावरण सौंदर्य माणसाच्या मनाला भुरळ घालते; मात्र हे गाव आजही विकासापासून वंचित आहे. येत्या ९ तारखेला येथे पर्यावरण परिषद होत आहे या निमित्ताने या गावाचा इतिहास व प्रश्नांचीही चर्चा होऊन विकासाचे नवे चक्र सुरू होण्याची अपेक्षा आदिवासी बांधवांमध्ये आहे.जळगाव जामोद शहराच्या उत्तरेस बर्हाणपूर रस्त्याच्या पूर्वेस २१ किमी. अंतरावर हे गाव वसलं आहे. सातपुड्यातील सर्वात उंच ठिकाणावर असलेले हे ठिकाण उत्तम थंड हवेचं ठिकाण आहे. येथे आदिवासी भिल, कोरकू, न्याहाल आणि गोंड लोकांची वस्ती असून या जमातीचे लोक सध्या पर्व पायथ्याशी इतरत्र येऊन वस्तीने राहू लागले; मात्र सध्या भिलाला, पावरा, बारेला या आदिवासी जमाती येथे आढळतात. सर्व भिलाला जातीचे आदिवासी मुले आता शहराच्या सान्निध्यात राहून शिकायला लागली आहेत. उद्योगांची आस धरत आहेत. परंतु अपुरे मार्गदर्शन आणि शिक्षणाबाबतीत येणार्या अडचणींमुळे ती मागे राहिली आहेत.ही मुले शिकली; मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्रांचा प्रश्न शासन दरबारी अद्यापही प्रलंबित असल्याने तो या आदिवासींच्या विकासातील सर्वात मोठा अडसर ठरत आहे. त्या कारणाने त्यांच्या मुलांना कुठल्याही शैक्षणिक सुविधा मिळत नाहीत. शासकीय योजनांच्या लाभापासून ते वंचित राहतात. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते आरक्षणापासून अद्यापही वंचित आहेत. तो प्रश्न लवकर निकाली काढल्यास हे आदिवासी निश्चितच विकासाच्या प्रवाहात येतील.
आदिवासी गावाला हवे विकासाचे कोंदण
By admin | Published: January 07, 2015 12:28 AM