लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : विदर्भात खळबळ माजविणाºया ‘स्क्रब टायफस’ या आजाराचा जिल्ह्यात कोणताही धोका नसल्याची बाब जिल्हा आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात समोर आली. ‘स्क्रब टायफस’या आजारा पहिला रूग्ण आढळेल्या टेंभूर्णा येथे तीन दिवसांमध्ये तीन हजार ३७२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तर ६५२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.
‘स्क्रब टायफस’ या आजाराचा बुलडाणा जिल्ह्यातील पहिला रुग्ण खामगाव तालुक्यातील टेंभूर्णा येथे आढळल्याचे स्पष्ट होताच, आरोग्य प्रशासनाचे पथक शनिवारी पहाटेच टेंभूर्णा येथे दाखल झाले. त्यानंतर तीन दिवसांमध्ये टेंभूर्णातील ६५२ घरांचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले. तर ५ ठिकाणी उंदरांचे सापळे लावले. मात्र, या सापळ्यांमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये एकही उंदिर पडला नाही. त्यामुळे सोमवारी पुन्हा पिंजरे स्वच्छ करण्यात आले. सर्वेक्षणात या गंभीर आजाराचा रूग्णही आढळून आला नाही. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने सुटकेचा श्वास सोडला आहे. डेंग्यू आणि ‘स्क्रब टायफस’ या आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे शनिवारी पहाटेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस.बी. चव्हाण आपल्या पथकासह खामगाव तालुक्यातील टेंभूर्णा येथे दाखल झाले होते. दरम्यान, रविवारी सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनीही टेंभूर्णा येथे भेट दिली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.खिरोडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक ठाकरे, आरोग्य सहा. जी.एन. खोडके टेंभूर्णा येथे तळ ठोकून होते.
तीन पथकाद्वारे कन्टेनर सर्वेक्षण!
टेंभूर्णा येथील ६५२ घरांचे सर्वेक्षण पुर्णत्वास नेण्यासाठी अटाळी प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येत असलेल्या आरोग्य सेवकांची तीन पथके तयार करण्यात आली. यामध्ये आरोग्य सेवक डी.एस. मात्रे, आर.व्ही. वाकोडे, एस.पी. खरात, आरोग्य सेविका व्ही.टी. माळे, व्ही. एन. पोदाडे, पी.पी. चव्हाण यांचा समावेश होता.