शेगाव (बुलडाणा): शेतमालक परगावी असल्याने तो मृत दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे शेती हडप करण्याचा प्रकार शेगावात उघडकीस आला. याबाबत शेगाव ग्रामीण पोलिसांनी विविध कलमान्वये नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात खामगाव येथील एका मोठय़ा रॅकेटचा पर्दाफाश होणार असल्याची माहिती मिळाली आहे.शेगाव ग्रामीण पोलिसात नागपूर येथील मो.इस्माईल मुश्ताक अहेमद यांनी तक्रार दाखल केली, की शेगाव तालुक्यातील लासुरा खुर्द शिवारात त्यांच्या मालकीच्या शेत गट नं.४४ क्षेत्रफळ ४ हे. ९ आर या शेतीचे मालक स्थानिक रहिवासी नसल्याचे पाहून याचाच गैरफायदा घेत राजेश मधुकर जाधव, रा.सीतला माता मंदिर, पानट गल्ली, खामगाव याने शबिनाबी ज.इस्माईल महंमद, अजर अहमद इस्माईल महम्मद व इमरान अहमद इस्माईल महम्मद रा. नागपूर यांच्याकडून खोटे बनावट कागदपत्रांच्या आधारे खामगाव येथील देवीदास नामदेव श्रीनाथ, राजेश पांडुरंग लांडे रा. जयपूर लांडे व नंदन गणेश चौकसे रा. खामगाव आणि गजानन पटोकार रा.लासुरा यांनी संगनमत करून नोटरीद्वारे सदर शेतीची सौदाचिठ्ठी करून, संगनमत करून फसवणूक केली. यामध्ये आपण जिवंत असताना अकोला महानगर पालिकेचा बनावट मृत्यू दाखला तयार केला. शिवाय माझे भाऊ शकील अहेमद मुश्ताक खान यांचा मृत्यू झाला असून, त्यांना जिवंत दाखवून नोटरीवर खोट्या सह्या व अंगठय़ाचे ठसे घेतले आहेत, तसेच माझ्या मृत भावाचे बनावट आधारकार्ड व मतदान कार्डसुद्धा तयार केले आहे. हा सर्व प्रकार वरील लोकांनी माझी शेती हडप करण्याच्या हेतूने केला असून, या सर्वांविरुद्ध फसवणूक करणे व खोटे दस्तावेज तयार केले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
जिवंत व्यक्तीला मृत दाखवून शेती हडपण्याचा प्रयत्न
By admin | Published: March 10, 2016 2:08 AM