लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : दुकानदारांकडून तूरडाळीचे भाव ऐकताच ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत. कारण तूरडाळीचे भाव पुन्हा एकदा शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. आयात कमी झाल्याचा हा परिणाम आहे. हरभरा डाळीचे भाव मात्र स्थित असल्याचे चित्र आहे.पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीचे परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीने दिसायला लागले आहेत.तूरडाळीच्या भावात ७०० ते ८०० रुपये वाढ होऊन सध्या ९,२०० ते ९,५०० रुपये क्विंटल विकते आहे, तर किरकोळ विक्रीत ९५ ते ९८ रुपये किलोने तूरडाळ ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे. तूरडाळीपाठोपाठ मूगडाळीचे भाव २०० ते ३०० रुपयांनी वधारून ९,००० ते ९,५०० रुपये क्विंटल विकली जात आहे. ही डाळ ९४ ते ९७ रुपये किलोने विकत आहे. या दोन्ही डाळी महागल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत.उडीद डाळही ८,००० ते ८,५०० रुपये तर मसूर डाळ ७,००० ते ७,५०० रुपये क्विंटल विकली जात आहे.ग्राहकांना थोडा दिलासा म्हणजे सर्वाधिक विक्री होणाऱ्या हरभरा डाळीचे भाव ५,२०० ते ५,५०० रुपयांवर स्थिर आहेत. आयात कमी झाल्याने व मागणी वाढत असल्याने डाळीचे भाव वधारल्याचे होलसेल व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. डाळी महागल्याने महिन्याचे बजेट बिघडल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शहरासह ग्रामीण भागातील ग्राहक व्यक्त करत आहेत.
व्यापाऱ्याचाच फायदातुरीचा हमीभाव ६,००० रुपये आहे. ७० टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील तूर ५,००० ते ५,५०० रुपये प्रति क्विंटलने व्यापाऱ्यांना विकली. आता मोठे व्यापारी, कंपन्यांकडे तुरीचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. आता तूर ६,९०० ते ७,००० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. हमीभावापेक्षा जास्त किमतीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा मोठ्या व्यापाऱ्यांनाच होत आहे.