लोणार (जि. बुलडाणा): भाईचंद हिराचंद रायसोनी क्रेडिट सोसायटीच्या पुणे येथील शाखेत झालेला अपहार उघडकीस आल्यानंतर बँकेच्या ठेवीदारांनी राज्यभरातील शाखेत ठेवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या आपल्या ठेवी परत मागण्यास सुरुवात केल्यानंतर गोत्यात आलेल्या पतसंस् थेच्या व्यवस्थापनाने आपल्या शाखा मध्यंतरीच्या काळापुरत्या बंद ठेवण्याचे आदेश संबंधित शाखेच्या व्यवस्थापकाला दिल्या. यामुळे ठेवीदारांच्या ठेवी पतसंस्थेत अडकल्याने ठेवीदारांची मोठी पंचाईत झाली आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी क्रेडिट सोसायटीच्या लोणार शाखेत ठेवीवरील आकर्षक व्याजदरामुळे तालुक्यातील जवळपास ५६0 पेक्षाही जास्त लहान-मोठय़ा ठेवीदारांची ३.५0 ते ४ कोटी रुपये रक्कम ठेव स्वरूपात जमा आहे. यामध्ये शहरातील लहान- मोठे व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते, शिक्षक इत्यादीचा समावेश आहे. ठेव स्वरूपात ठेवलेली रक्कम परत मिळविण्यासाठी ठेवीदारांनी जळगावपर्यंंत शेकडो वार्या केल्या; मात्र त्यांच्या हाती अद्यापपर्यंंत काहीच न लागल्याने ठेवीदार दुष्काळसदृश परिस्थितीत आर्थिक संकटात सापडले आहेत. पतसंस्थेमार्फत जवळपास १.५0 ते २ कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले असून, ते वसूल करून ठेवीच्या रकमा परत देण्याची मागणी ठेवीदारांकडून होत आहे. मात्र व्यवस्थापनाने पतसंस्थेची लोणार शाखाच बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आता ठेवीदारांना पुन्हा आपल्या ठेवीसाठी जळगावच्या वार्या कराव्या लागणार आहे. यामुळे आधीच ठेवीची रक्कम मिळत नसल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ठेवीदारांना मानसिक त्रास ही सहन करावा लागणार आहे.
बीएचआर सोसायटीचे ठेवीदार अडचणीत
By admin | Published: May 15, 2015 11:36 PM