बुलढाणा :
येथील पाटबंधारे कार्यालायील व्हीडीओ कॉन्फन्ससाठी वापरण्यात येणारा ५२ इंची टीव्ही अज्ञाताने चोरुन नेला. ही घटना २४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. याप्रकरणी मात्र ३० ऑगस्ट रोजी अधीक्षक अभियंता यांच्या तक्रारीवरुन शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील पाटबंधारे प्रकल्प कार्यालयाच्या नुतनीकरणाचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे या कार्यालयाचा कारभार अधीक्षक अभियंता यांच्या निवासस्थान आणि दलाल ले-आऊटमधील लघु पाटबंधारे विभाग अशा दोन ठिकाणाहून सुरु आहे. तेव्हा उच्चस्तरीय व्हीडीओ कॉन्फरन्ससाठी लागणारा ५२ इंच टीव्ही (कि.२० हजार ) हा नुतनीकरण सुरु असलेल्या इमारतीमधील कपाटामध्ये होता. २४ ऑगस्ट रोजी बैठक हॉलमध्ये टीव्ही आणण्यासाठी शिपाई गेला असता त्याला तिथे टीव्ही आढळून आला नाही.तेव्हा टीव्ही चोरीला गेल्याचे दिसून आले. तेव्हा अधीक्षक अभियंता तुषार चंद्रशेखर मेतकर यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंपणच शेत तर खात नाही ना ?मागील काही दिवसांपासून शहरातील शासकीय कार्यालयातील वस्तू चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. येथील जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील शासकीय कामकाजाकरिता देण्यात आलेल्या लॅपटॉपपैकी एक लॅपटॉप अज्ञाताने चोरून नेला. ही घटना १ एप्रिल ते २८ जुलै दरम्यान घडली. मात्र, याप्रकरणी २५ ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा शासकीय कार्यालयातील वस्तु चोरीला जात असताना कुंपणच तर शेत खात नाही ना? असा सवाल या निमित्ताने विचारल्या जात आहे.