बुलढाणा: तालुक्यातील शिरपूर येथे शेतकऱ्यांचे शेती साहित्य चोरणाऱ्या दोघांना ग्रामस्थानी रंगेहात पकडले. ही घटना २५ सप्टेंबर रोजी रात्री दहा ते ११ वाजता दरम्यान घडली. याप्रकरणी रायपूर पोलिसांनी २६ सप्टेंबर रोजी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यात काही मागील दिवसांपासून लहान मुलांचे अपहरण करणारे सक्रीय झाल्याच्या अफवा पसरल्या आहेत. यामुळे काही ग्रामस्थांनी गावो-गावी युवकांचे पथके नेमली आहेत. या पथकांद्वारे गावात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या हालचालीवर लक्ष दिले जाते. अशातच २५ सप्टेंबर रोजी रात्री दहा ते साडे दहा वाजता दरम्यान शिरपूर येथील भास्कर रोडूबा शेळके व पंढरी शिवाजी शेळके दोघे शेतात झोपायला गेले होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास भास्कर शेळके यांच्या मळणी यंत्रावरील मोटार दोन अज्ञात चोरटे चोरून नेत असल्याचे त्यांना दिसले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केल्याने चोरट्यानी घटनास्थळावरुन पळ काढला.
मात्र शेतकऱ्यांनी पाठलाग करून दोघांना पकडले. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी ते साखळी बु. येथील रहिवासी असून, शेख आरमान शेख सिकंदर (१९) व सय्यद परवेझ सय्यद बब्बु (२५) अशी नावे सांगितली. दोघा चोरट्यांना रायपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.