रायपूर येथील कैलास काकडे यांच्या गोठ्याला ही आग लागली होती. त्यांचा सोनार गव्हाण मार्गावर पक्के बांधकाम केलेला गोठा आहे. त्या गोठ्यास ही आग लागली होती. नेहमीप्रमाणे मंगळवारी शेतातील कामे आटोपून कैलास काकडे हे पाऊस सुरू असल्याने गुरांचा चारापाणी करून सायंकाळी घरी गेले होते. दरम्यान, त्यांच्या गोठ्यानजीक असलेल्या गोठ्याचे मालक संदीप वाहेकर हे रात्री गोठ्यावर गेले असता कैलास काकडे यांच्या गोठ्याला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित त्याची माहिती कैलास काकडे व गावकऱ्यांना दिली. ग्रामस्थही त्वरित मदतीसाठी धावले. परंतु, तोवर आगीने भडका घेतला. त्यात काकडे यांच्या गोठ्यातील दोन गीर गायी आणि शेती उपयोगी दोन अैाषधी फवारणी पंप, स्प्रिंकलर संच, बी-बियाणे, कीटकनाशके, मोटार संच, वखर, पेरणी यंत्र व अन्य साहित्य नष्ट झाले. सुमारे दोन लाख रुपयांचे यात नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
--तलाठ्यांनी केला पंचनामा--
या घटनेची माहिती मंडळ अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांना देण्यात आली. त्यानंतर तलाठी जे. आर. होणे व सहकाऱ्यांनी पंचनामा केला. यात सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले.
--वीज कोसळून लागली आग--
रात्री गोठ्यानजीकच्या झाडावर वीज कोसळून लगतच्या झोपडीने पेट घेतला. त्यामुळे कुटार पेटून गोठ्याला आग लागली व हे मोठे नुकसान झाल्याचे कैलास अंबादास काकडे यांनी सांगितले.