बुलडाणा : शहरातील गवळी पुरा भागातील दोन मुले व एक मुलगी सोमवारी अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यातील दोन मुलांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आला. तर मुलीवर उपचार सुरू आहे. येथील गवळी नगरातील सहर शेख हमीद (वय ४), शेख अहिल शेख जमील (वय ५) व शेख अजीम शेख शामिर ( वय ३) हे सोमवारी सकाळी घरुन अंगणवाडीत गेले होते. सुटी झाल्यानंतर तीनही मुले दुपारी १२ वाजेपर्यंत घरी पोहोचले नाही. त्यामुळे पालकांनी त्यांचा शोध घेतला. परंतू परिसरात ते आढळले नाहीत. त्यामुळे पालकांनी तीनही मुलांचा शहरात शोध सुरु केला. मात्र रात्रीपर्यंत त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे बुलडाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. शेख अहिल शेख जमील व शेख अजीम शेख शामिर हे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील रहिवासी असून आपल्या आजोबाकडे आले होते. मुले अचानक बेपत्ता झाल्याने पोलिसांसह घरच्या मंडळींनी मुलांचा सर्वत्र शोधाशोध सुरू केला. दरम्यान, रात्री अडीच ते तीनच्या सुमारास गवळीपुरा भागातील एका कारमध्ये तीनही मुले अडकल्याचे पोलिसांना दिसून आले. तेव्हा कारचा दरवाजा उघडुन बघीतला असता त्यातील शेख अहिल शेख जमील व शेख अजीम शेख शामिर या दोघांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. तर सहर शेख हमीद ही मुलगी अत्यवस्थ असल्याने तिच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. कारमध्ये गुदमरून या मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
बुलढाण्यात बंद कारमध्ये गुदमरून दोन बालकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 9:42 AM
दोन मुलांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आला.
ठळक मुद्दे सहर शेख हमीद (वय ४), शेख अहिल शेख जमील (वय ५) व शेख अजीम शेख शामिर ( वय ३) हे सोमवारी सकाळी घरुन अंगणवाडीत गेले होते. सुटी झाल्यानंतर तीनही मुले दुपारी १२ वाजेपर्यंत घरी पोहोचले नाही. त्यामुळे पालकांनी त्यांचा शोध घेतला.रात्री अडीच ते तीनच्या सुमारास गवळीपुरा भागातील एका कारमध्ये तीनही मुले अडकल्याचे पोलिसांना दिसून आले.