जळगाव जामोद : तालुक्यातील ग्राम जामोद येथे दोन शेजारी शेजारी असलेल्या कुटुंबात मुलीची लग्नासाठी मागणी केल्याच्या प्रकरणावरून मंगळवारी ३१ ऑगस्ट रोजी रात्री वाद उफाळला.या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यात मुलीचा काका नुरखान समशेरखान वय ३३ हा जागीच ठार झाला.तर मुलीचे वडील रसुलखान समशेरखान आली असून हे जखमी झाले असून त्यांच्यावर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याबाबतची हकीकत अशी की जामोद येथील जैन मंदिर परिसरातील निवासी शेख नजीर शेख कदिर वय ४५ याचा मुलगा शेख जुबेर शेख नजीर वय १८ याचेसाठी शेजारी राहत असलेल्या रसूल खान समशेरखान वय ४२ यांच्या मुलीसाठी मागणी घालत होते.परंतु रसूलखान समशेरखान यांच्या कुटुंबीयांची त्यांना मुलगी देण्यासाठी मानसिकता नव्हती.कारण मुलीचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असल्याने मुलाच्या कुटूंबाचा प्रस्ताव मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता.यावरून काही महिन्यापासून या दोन कुटुंबात वाद होत असत. मंगळवारी सायंकाळी प्रथम या दोन्ही कुटुंबातील महिलांमध्ये यावरून वाद उफाळला.त्यानंतर मुलाच्या कुटुंबाने मुलीच्या कुटुंबीयांना आपल्या घरी बोलावले परंतु चर्चा न होता सरळ वादाला सुरुवात झाली आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये मुलीचा काका नूरखा समशेरखा वय ३३ याच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारला गेल्याने त्यामध्ये तो जागीच ठार झाला.तर मुलीचे वडील रसूलखान समशेरखान हे गंभीर जखमी झाले असून त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसात भादंविच्या ३०२,३०७ व ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी शेख नजीर शेख कदीर वय ४५,शेख सद्दाम उर्फ सरदार शेख नजीर वय २०,शेख जुबेर शेख नजीर वय १८ या तिघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी शेख जुनेद शेख नजीर हा सध्या फरार आहे.याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकोडे हे पुढील तपास करीत आहे.पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देवून परिस्थिती नियंत्रणात आणली,त्यामुळे पुढील अनर्थ टळला.