अंढेरा (जि. बुलडाणा): शेतातील स्प्रींक्लरचे नोझल बदलताना लोंखडी पाईपमध्ये वीजेचा प्रवाह आल्याने शॉक लागून नात्याने काका-पुतण्या असलेल्या दोन शेतकर्यांचा आंचरवाडी शिवारात बुधवारी मृत्यू झाला. भीमराव रामकृष्ण परिहार (काका) आणि गणेश लक्ष्मण परिहार (पुतण्या) अशी मृत पावलेल्या दोन्ही शेतकर्यांची नावे आहेत.
देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या आंचरवाडी येथे भाग एक मधील गट नं. ३७ मध्ये त्यांचे सुमारे साडेचार एक्कर शेत आहे. दोघांचीही शेती वेगवेगळी व एकमेकाला लागूनच होती. सकाळी या शेतात पेरलेल्या गव्हाला पाणी देण्यासाठी ते गेले होते. दरम्यान, विहीरीवरील वीज जोडणीच्या पेटीजवळच स्प्रींकलरचे लोखंडी पाईप ठेवण्यात आलेले होते. या पाईपला लावण्यात आलेले स्प्रींकलरचे नोझल काढत असताना त्यात वीजेचा प्रवाह आल्याने गणेश लक्ष्मण परिहार यास वीजेचा जोरदार शॉक लागला. ते पाहताच त्याला वाचविण्यासाठी भीमराव रामकृष्ण परिहार हे गेले असता त्यांनाही वीजेचा जोरदार शॉक लागून दोघेही घटनास्थळीच ठार झाले, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक व्ही. एल. कवास यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
या घटनेनंतर कामानिमित्त दिनकर बाबुराव परिहार यांनी गणेश लक्ष्मण परिहार यास भ्रमणध्वनीवर फोन केला असता त्याने तो उचलला नाही. म्हणून दिनकर परिहार हे त्याला पाहण्यासाठी शेतात गेले असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर दिनकर बाबुराव परिहार यांनी आंचरवाडी गावात या घटनेची माहिती फोनवरून दिली. त्यानुषंगाने संजय नारायण परिहार व त्यांचे सहकारी गावात गेले असता त्यांना भीमराव रामकृष्ण परिहार व गणेश परिहार हे वीजेचा शॉक लागून मृत्यूमुखी पडलेले असल्याचे निदर्शनास आले. प्रकरणी संजय नारायण परिहार (रा. आंचरवाडी) यांनी अंढेरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील कारवाई अंढेरा पोलिस करीत आहेत.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक व्ही. एल. कवास, समाधान झीने आणि निवृत्ती पोफळे या पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सध्या दोन्ही मृत शेतकऱ्यांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी उपरोक्त पोलिस कर्मचारी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात आहेत.
आंचरवाडी शिवारीतल गव्हाच्या शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या भीमराव रामकृष्ण परिहार आणि त्यांचा पुतण्या गणेश लक्ष्मण परिहार यांचा स्प्रींकलरचे नोझल काढत असताना पाईपात वीजेचा प्रवाह आल्याने शॉक लागून मृत्यू झाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.- व्ही. एल. कवास, पोलिस उपनिरीक्षक, अंढेरा