२०१९ सालच्या 'कृषिभूषण सेंद्रिय शेती' पुरस्कारावर चिखली तालुक्यातील मंगरूळ ईसरूळ येथील शेतकरी प्रल्हाद संपत गवते तर 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी' पुरस्कारावर तालुक्यातील मलगी येथील अनिता रामसिंग पवार यांनी मोहर उमटविली आहे. विशेष म्हणजे राज्यस्तरावरील दोन पुरस्कार बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले असून, हे दोन्ही शेतकरी चिखली तालुक्यातील असल्याने कृषी क्षेत्रात बुलडाणा जिल्ह्यास चिखलीचा गौरव वाढला आहे. या दोन्ही शेतकऱ्यांना ३१ मार्च रोजी जिल्हा परिषद बुलडाणा येथे कृषी विषय समितीच्या वतीने सभापती राजेंद्र पळसकर, कृषी विकास अधिकारी अनिता महाबळे, कृषी विषय समितीचे सदस्य बुधवत, गवई, मोरे, सौदागर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मोहीम अधिकारी खोदील, कृषी अधिकारी पाटील, कृषी उपसंचालक बेतवार लाहरे, चिखली तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, कृषी अधिकारी संदीप सोनुने, मंडळ अधिकारी अंभोरे व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक खारोळे उपस्थित होते.
प्रल्हाद गवते यांचा सेंद्रिय शेतीसाठी पुढाकार !
प्रल्हाद गवते यांनी सेंद्रिय गटाची स्थापना करून कमी खर्चामध्ये दर्जेदार सेंद्रिय उत्पादन घेत आहेत. सुरुवातीला ५० शेतकऱ्यांचा गट स्थापन करून गटातील शेतकऱ्यांनी प्रत्येकी एका एकरात सेंद्रिय पद्धतीने कडधान्य व गहू उत्पादन घेतले. गहू बियाणे म्हणून थेट उत्तराखंडमध्ये मागविण्यात येतो. सद्य:स्थितीत ५० सदस्यांचे एकूण चार गटांमार्फत या भागात सेंद्रिय शेती होत आहे.
अनिता पवार यांनी खडकाळ माळरानावर फुलविली फळबाग !
मलगी येथील अनिता रामसिंग पवार यांनी खडकाळ माळरानावर शेततळ्याच्या साहाय्याने कमी पाण्यात व कमी खर्चाच्या फळपिकांची निवड करून फळबाग फुलविली. शेतकरी अनिता पवार यांनी सीताफळ, बोर, लिंबू, पपई या फळपिकातून भरघोस उत्पादन घेऊन नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांच्या शेतातील सीताफळास 'महासीताफळ' या नावाने मागणी असते.