लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कामातील अनियमितता आणि एफडीएने जप्त केलेला गुटखाच एफडीएच्या गोडावून मधून चोरी गेल्याच्या प्रकरणात चौकशी अंती बुलडाणा येथील अन्न व औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त (अन्न) अनिल राठोड व अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांना आयुक्त अरुण उन्हाळे यांनी निलंबीत केले आहे.राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधीत गुटख्याची विक्री होत होती. त्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात होत असलेल्या गुटखा विक्री विरोधात मोहिम उघडून मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त करण्यात आला होता. मात्र बुलडाणा येथील अन्न व औषध प्रशान कार्यालयाच्या गोडावून मधून दोनदा जप्त केलेला गुटखाच चोरी झाला होता. या संदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रात्रीच या कार्यालयाची झाडाझडती घेतली होती. सोबतच एफडीएच्या गोडावूनमध्ये जप्त करण्यात आलेला नेमका गुटखा किती व चोरी गेलेला गुटका किती याचा अहवालच पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून मागवला होता. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यात मोठी तफावत आढळून आली होती. पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्याचा पंचनामा करून अनुषंगीक अहवाल सादर केला होता. प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले होते.त्यानुषंगाने अन्न विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल राठोड व अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकर यांना निलंबीत करण्यात आले आहे. १३ मार्च रोजी यासंदर्भातील आदेश निर्गमीत करण्यात आले असून ही माहीती १७ मार्च रोजी उघड झाली.दरम्यान, या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रसासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे आल्या होत्या. प्रकरणी अनुषंगीक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी एफडीएचे आयुक्त अरूण उन्हाळे यांना दिले होते. त्यानुषंगाने ही कारवाई करण्यात आली. निलंबन काळात या दोघांचेही मुख्यालय हे मुंबई राहणार असून त्यांची विभागीय चौकशीही करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)
'एफडीए'चे दोन अधिकारी निलंबीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 3:01 PM