लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : शहरातील पंचवटी परिसराजवळील ज्ञानगंगा नदीपात्रात प्रातर्विधीसाठी गेलेल्या १६ वर्षीय तरुणीला त्या नदीपात्रात अवैध रेती उत्खनन करणार्या तरुणांच्या टोळक्याने हटकल्याने ३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान दोन गटात हाणामारी झाली. नांदुरा पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली; मात्र रात्रीपर्यंत नांदुरा शहरात तणावपूर्ण शांतता असून, संध्याकाळपासून जिल्हा पोलीस अधीक्षक तळ ठोकून होते व अतिरिक्त पोलीस फाटा शहरात तैनात करण्यात आला आहे.पंचवटी नांदुरा खुर्द परिसराजवळील ज्ञानगंगा नदीपात्रात अवैध रेतीचा उपसा होत असल्याबाबतच्या तक्रारी यापूर्वीच या भागातील नागरिकांनी तहसील कार्यालयात केल्या आहेत; मात्र ३ जानेवारी रोजी दुपारी याच भागातील १६ वर्षीय तरुणी प्रातर्विधीसाठी गेली असता त्या भागात रेतीचे अवैध उत्खनन करणार्या टोळक्याने त्या तरुणीला हटकले. याबाबत त्या मुलीने घरी जाऊन आपबिती सांगितली असता याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणासोबत रेती माफिया गुंडांचा वाद होऊन या वादाचे रूपांतर दोन गटातील संघर्ष व हाणामारीत झाले. त्यामुळे नांदुरा खुर्द परिसरात तणाव निर्माण झाला. तणाव वाढल्याने झालेल्या वादात काही घरांचे, दुचाकी व दुकानांचे नुकसान झाले. काही रेती माफिया गुंडांनी घरात घुसून महिलांना मारहाण केल्याने या भागातील नागरिक महिलांसोबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी येत असताना नांदुरा खुर्द येथील पुलावर दगडफेक झाली. नांदुर्याचे ठाणेदार पाटील व पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती. उशिरा रात्रीपर्यंत नांदुरा शहरात तणावपूर्ण शांतता होती. (प्रतिनिधी)
संरक्षण देण्याची महिलांची मागणीरेती माफिया गुंडांनी महिलांना घरात घुसून मारल्याने घाबरलेल्या महिला रात्रीपर्यंत पोलीस स्टेशन येथे तळ ठोकून होत्या. साहेब आम्हाला ते मारतील हो, आम्हाला संरक्षण द्या, अशी आर्त हाक देत होत्या. याबाबत पोलीस प्रशासन त्यांना सुरक्षित घरी पोहोचविण्याचे व सुरक्षा करण्याचे आश्वासन देत होते.