किनगाव जट्ट (जि. बुलडाणा), दि. १५- लोणार तहसील अंतर्गत येत असलेल्या देवानगर येथील दोन नागरिकांचे घर जळून खाक झाले. ही घटना १२ मार्च रोजी घडली असून, दोन्ही कुटुंब बेघर झाले आहेत. किनगाव जट्ट येथून जवळच असलेल्या देवानगर येथे होळीच्या दिवशी येथील महिला व पुरुष होळी खेळण्यात रममान असताना अचानक रोहीदास फुलसिंग चव्हाण यांच्या घराला आग लागल्याने घर पूर्णपणे जळून खाक झाले. आगीमध्ये घरातील ११ टीनपत्रे, गहू, ज्वारी, खाण्या-पिण्याकरिता साठवून ठेवलेले डाळ, अंगावरचे कपडे व घरातील पूर्ण कपडे, शे तीपयोगी अवजारे, तीन दरवाजे, असे एकूण ७१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आग पीडीत बेघर, निराधार झाले. आगपीडित घरात चार व्यक्ती असून, ते भूमिहीन आहेत. दुसरे घर गोविंद झिपा राठोड यांचेसुद्धा राहते घर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या घरावरील दहा टीनपत्रे जळून खाक झाले असून, सोबत गहू, डाळ, दाणा, कपडे, भांडे, तीन दरवाजे, सायकल व इतर साहित्य मिळून ६९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आगपीडित बेघर, निराधार झाला आहे. आग विझविण्याचा गावकर्यांनी प्रयत्न केला; परंतु आगीत दोन्ही घरे सामानासह जळून खाक झाले आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. दरम्यान, मंडळ अधिकारी व्ही.पी.नागरे, तलाठी ए.एस.सौदर यांनी पंचनामा केला असून, पंच म्हणून किनगाव जट्ट ग्रा.पं. सदस्य नीलेश महाजन, शिवाजी जाधव, पोलीस पाटील श्रीराम पवार, कोतवाल मधुकर मिसाळ, रमेश राठोड, गलसिंग जाधव आदी पंच उपस्थित होते. आग पीडितांना शासनाचेवतीने आर्थिक मदतीची मागणी होत आहे.
दोन घरे जळून खाक
By admin | Published: March 16, 2017 3:24 AM