जानेफळ: मालवाहू वाहन व दुचाकी अपघात दोन जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १२ जून रोजी सायंकाळी ७ वाजे दरम्यान घडली. हा अपघात जानेफळ-मेहकर मार्गावर स्थानिक जिजामाता नगर जवळ घडला. मेहकर तालुक्यातील मोसंबे वाडी येथील ओम गजानन मोसंबे, अक्षय गजानन भाकडे, नागेश गजानन मोसंबे व परतापूर येथील अनंथा दत्तत्रय रिंंढे हे दुचाकीने (क्रमांक एम-एच-२०-ई-झेड-२९०४) मेहकर येथून जानेफळकडे येत होते. समोरून येणारे मालवाहू वाहन (क्रमांक एम-एच-२८-बी-बी-०५६०) व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ओम गजानन मोसंबे व अक्षय गजानन भाकडे हे दोघे जागीच ठार झाले. नागेश गजानन मोसंबे व अनंथा दत्तत्रय रिंढे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्या दोघांना मेहकर येथे प्राथमिक उपचार करून औरंगाबाद हलविण्यात आले आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पे्रत शवविच्छेदनासाठी मेहकर ग्रामीण रुग्णालयात पाठविले. वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. अपघातानंतर मालवाहू वाहन चालक अनिल सुरेश सोनुने (रा. शेगाव) याने आपले वाहन थेट पोलीस स्टेशनला आणून पोलिसांना अपघाताची माहिती दिली व अटक करून घेतले. (वार्ताहर)
मालवाहू वाहन व दुचाकी अपघातात दोन ठार, दोन गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 10:20 IST