लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : तालुक्यातील परडा फाट्यानजीक भरधाव वेगातील कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातामध्ये चिखली शहरातील दोन जण जागीच ठार झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली. जळगाव खान्देश येथून ट्रॅक्टरचे साहित्य घेऊन हे दोघे चिखली येथे जात असताना मलकापूर-बुलडाणा मार्गावर हा अपघात झाला. या अपघातामध्ये कार चालक निशिकांत सदाशिव पाटील (४०, रा. आनंदनगर चिखली) आणि साजीद अहमद खान राजदार खान (४२, रा. बारभाई मोहल्ला, चिखली), अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही जळगाव खान्देश येथे ट्रॅक्टरचे सामान आणण्यासाठी एमएच-०२-बीजी-०३१७ क्रमांकाच्या कारने गेले होते. तेथून साहित्य घेऊन परत येत असताना ३१ जानेवारी रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास मलकापूर-बुलडाणा मार्गावर परडा फाट्यानजीक कार चालवत असताना निशिकांत सदाशिव पाटील यांचे वाहनावरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर कार आदळली. त्यात गंभीर जखमी झाल्याने या दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी प्रकाश त्र्यंबक खर्चे (४५, रा. लोणवाडी, ता. मलकापूर) यांनी बोराखेडी पोलिसात तक्रार दिली आहे.
मलकापूर-बुलडाणा मार्गावर अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2021 11:06 AM