- योगेश देऊळकारलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागाने गत नोव्हेंबर महिन्यात आठ कोटी ५३ लाख ५१ हजार १८३ तर डिसेंबरमध्ये नऊ कोटी ५१ लाख ८७ हजार २३८ असे दोन महिन्यात एकूण १८ कोटी ५३ लाख आठ हजार ४२१ रुपयांचे उत्पन्न मिळविले. लाॅकडाऊननंतरच्या काळातील हे उच्चांकी उत्पन्न ठरले. या उत्पन्नाने महामंडळाला एकप्रकारे नवसंजीवनी मिळाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊन काळात एसटी वाहतूक ठप्प असल्याने महामहामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. लाॅकडाऊननंतर २० ऑगस्ट २०२० रोजी वाहतूक सुरू करण्यात आली. सुरुवातीला काेरोनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने सर्व उपाययोजनांचा अवलंब करण्यात आला. सुरुवातीच्या काळात झिगझॅग पद्धतीने एकूण प्रवासी क्षमतेच्या केवळ ५० टक्के क्षमतेने वाहतूक करण्यात येत होती. तरी देखील भीतीपोटी नागरिकांनी प्रवासासाठी एसटीकडे पाठ फिरविली होती. मात्र त्यानंतरच्या काळात हळूहळू एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. यामुळे अतिशय तोट्यात चाललेल्या एसटी मंडळाने काही प्रमाणात उत्पन्न सुरू झाले. हे उत्पन्न वाढविण्यासाठी दिवाळी सणाचा महत्त्वपूर्ण हातभार लागला. दिवाळीपासून खऱ्या अर्थाने एसटी वाहतूक सुरू झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आता कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याने एसटी महामंडळाची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढणार आहेे.
कोरोना काळातील लाॅकडाऊनमुळे एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे एसटी महामंडळाला खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता एसटी वाहतूक सुरळीत झाल्याने येणाऱ्या काळात उत्पन्नात निश्चितपणे वाढ होणार आहे.-ए. यू. कच्छवे, विभागीय वाहतूक नियंत्रक