बुलडाणा/डोणगाव : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील कणका शिवारातील पाझर तलावामध्ये गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर तिघांना वाचविण्यात नागरिकांना यश आले आहे. दरम्यान, वाचविण्यात आलेल्या तिघांवर डोणगाव येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहे. ही घटना रविवारी (दि. २३) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेमध्ये पुरुषोत्तम ज्ञानेश्वर सोळाके (१८) आणि महादेव गजानन ताकतोडे (१८) यांचा मृत्यू झाला तर अभय शिवाजीराव देशमुख आणि संतोष किसन धाडकर आणि ऋषी खराटे हे थोडक्यात बचावले. त्यांची प्रकृती चांगली असून ते धोक्याबाहेर असल्याचे समजते. मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील युवकांनी गणेश मुर्तीची स्थापना केली होती. रविवारी पारंपारिक पद्धतीने गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी ते गावानजिक असलेल्या कणका शिवारातील पाझर तलावावर सहकाऱ्यांसह गेले होते. गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी पाण्यात ते उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही जण पाण्यात बुडाले. सोबतच्या नागरिक व युवकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, पुरुषोत्तम ज्ञानेश्वर सोळाके आणि महादेव ताकतोडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना डोणगाव वरून मेहकर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अन्य तिघांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहे. यातील अवघ्या आठ वर्षाच्या ऋषी खराटेला रुग्णालयातून रात्री सव्वा आठच्या सुमारास सुटी देण्यात आली आहे.