पहिला अपघात कव्हाळा फाट्यानजीक एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झाला. यात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी आहे. दुसरा अपघात हा एका मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झाला. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ईसोली येथील दत्तात्रय श्रीराम शेळके (४८) व विष्णू मुरलीधर शेळके (दोघे रा. ईसोली) हे कव्हाळा येथे दुचाकीवर जात असताना शेगाव-पुणे (एमएच-१३-सीयू-६९२७) या बसची दुचाकीला जबर धडक बसली. त्यात दत्तात्रय शेळके हे जागीच ठार झाले तर विष्णू शेळके हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चिखली येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती रामभाऊ तुळशीराम शेळके (रा. ईसोली) यांनी दिली.
दरम्यान, दुसरा अपघात उंद्री गावानजीक लालमातीजवळ घडला. उंद्री येथील रहिवासी गोविंद रामराव नसवाले हे लालमातीकडून उंद्रीकडे दुचाकीवर (क्रमांक एमएच-२८ एक्स-६७६६) जात होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या मालवाहू वाहनाने (क्र. एमएच-२७-एक्स-७७८४) दुचाकीला जबर धडक दिली. त्यात गोविंद नसवाले हे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती श्रीकांत भास्करराव राऊत (३५, रा. उंद्री) यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसात सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.