अनिल गवई । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : मद्य प्राशन करून भरधाव वाहन चालवणार्या दोघा जणांवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून, कारवाई करण्यात आलेले दोघेही जण उच्च शिक्षित तरुण आत्महत्या करण्याच्या उद्देशाने वाहन चालवित होते ! शहर पोलिसांकडून मद्य प्राशन करून वाहन चालविणार्याविरुद्ध मोहीम उघडण्यात आली आहे. मलकापूर रस्त्यावर एक तरुण मद्य प्राशन केलेल्या स्थितीत दुचाकीवरून भरधाव जात होता. पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली. सदर युवक नागपूर येथील असून, तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. वडील रागावल्याने तो दोन दिवसांपासून दुचाकी घेऊन घरातून निघाला होता. शेगाव येथे थांबून मद्य प्राशन केल्यानंतर तो मलकापूरकडे भरधाव जात होता. पोलिसांनी कारवाई केलेल्या दुसर्या घटनेतील व्यक्ती पेशाने डॉक्टर आहे. सदर डॉक्टर शेगाव तालुक्यात एका आरोग्य उपकेंद्रात कार्यरत आहेत. अलिकडेच त्यांचा मोठा अपघात झाला होता. त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. शस्त्रक्रियेमुळे होणार्या वेदनेमुळे ते त्रस्त होते. पत्नी गावाला गेल्यानंतर सदर डॉक्टरने मद्यपान केले. अपघात घडविण्याच्या दृष्टीने शेगाव रस्त्यावर भरधाव वाहन चालवित असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. डॉक्टरला विश्वासात घेऊन चौकशी केली असता ही माहिती उजेडात आली. आपण केलेल्या कारवाईमुळे दोन जणांचे प्राण वाचल्याचे वेगळेच समाधान पोलीस पथकाला मिळाले. पोलिसांच्या या संवेदनशील भूमिकेबाबत सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.
पालकांना अश्र्रू झाले अनावर!नागपूर येथून निघालेल्या युवकाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या पालकांशी संपर्क साधला. नागपूर येथून त्याचे पालक तत्काळ खामगावकडे निघाले, तोपर्यंत पोलिसांनी सदर तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये थांबवले. त्याचे समुपदेशनही केले. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला आपला मुलगा सुखरुप असल्याचे पाहून या पालकांचे अश्रू अनावर झाले होते.
खामगाव शहर पोलिसांच्यावतीने मागील महिन्यांपासून मद्य प्राशन करुन वाहन चालविणार्यांवर मोहीम राबविण्यात येत आहे. सामाजिक जाणिवेतून काही युवकांची चौकशी केली असता, धक्कादायक वास्तव समोर आले. आत्महत्येच्या विचाराची कबुली दिल्यानंतर युवकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.- यू.के.जाधवपोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, खामगाव.