- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : एकच प्लॉट तिघांना खरेदी-विक्री प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर शेगावात एकाच क्रमांकाच्या फेरफारवर दोन वेगवेगळ्या खरेदी झाल्याचे समोर येत आहे. भूखंड घोटाळ्यातून खामगावात तलाठी चोपडेने अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. त्यामुळे शेगावातील नवा चोपडे कोण, असा प्रश्न आता शेगाव आणि परिसरातील नागरिकांना सतावत आहे. दरम्यान, शेगावातील फसवणूक प्रकरण महसूल कर्मचाऱ्याच्या अंगलट येणार असल्याची चर्चा आहे.शेगाव शहरात एकच भूखंड तिघांना विकल्याचे प्रकरण मार्च महिन्यात उजेडात आले. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांत २७ मार्च रोजी तक्रार झाली. त्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी तिघांविरोधात ७ मे २०२१ रोजी भादंवि कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतरही तीन आठवड्यापर्यंत पोलिसांनी याप्रकरणी कोणतीच कारवाई केली नाही. याउलट आरोपींना शह दिला. प्रकरण निस्तरण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांना अवधी देत, आरोपींना पाठीशी घातले. वरिष्ठांना अंधारात ठेवत शेगाव शहर पोलीस स्टेशनमधील कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात अर्थपूर्ण व्यवहारातून भूखंड घोटाळा दाबण्यासाठीही प्रयत्न चालविल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचवेळी महसूल विभागातील एक कर्मचारी या व्यवहारातील फेरफार दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून खरेदी खत रद्द करीत आरोपींना वाचविण्याचा पोलीस आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा संयुक्त प्रयत्न सुरू असल्याचा दावा विश्वसनीय सूत्रांनी केला आहे. याप्रकरणी शेगाव महसूल विभागातील एका अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, याप्रकरणी अधिक माहिती घेतली जात आहे. सविस्तर माहिती आल्यानंतर पुरावे दिले जातील, असे सांगत त्यांनी लोकमतकडे प्रतिक्रिया देण्याचे टाळले. या प्रकरणी दाेषींवर कारवाई करण्याची गरज आहे.
पोलिसांचा आरोपींना शह देण्याचा प्रयत्न?एकच प्लॉट तिघांना विकल्यानंतर शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधितांना अटक करण्यासाठी २५ दिवसांपेक्षा अधिक अवधी देण्यात आला. त्यामुळे आरोपींनी खरेदी खत रद्द करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यांना शेगाव महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांचे सहकार्य असल्याची चर्चा आहे. अर्थपूर्ण देवाण-घेवाणीतून शेगाव पोलीस स्टेशन कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी भूखंड घोटाळा निस्तरण्यासाठी प्रयत्नरत असल्याची चर्चा आहे.