लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूरः-आदिवासी पट्ट्यात वन्य प्राण्यांचे हल्ले प्रचंड वाढले आहेत. मंगळवारी रात्री वन्य प्राण्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला चढविल्याने दोन मेंढ्या ठार, एक जखमी तर सहा बेपत्ता झाल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले आहे. हि घटना संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी ग्राम सायखेड शिवारात घडली. सायखेड येथील साबू भिकाजी केदार यांच्या मालकीचे मेंढ्याचे कळप सायखेड शिवारात आहे. मेंढ्यांचा कळपावर मंगळवारी रात्री अचानक वन्य प्राण्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात दोन मेंढ्या ठार एक जखमी तर सहा बेपत्ता झाले आहे. जखमी झालेल्या मेंढरूला वन्य प्राण्याचा दात लागले आहे. तर ठार मारलेल्या एका मेंढरूचे माने पासून शिर तोडण्यात आले आहे. या घटनेची माहिती वन्यजीव विभागाला प्राप्त होताच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला आहे. सायखेड शिवारात याआधीही बहूतांश जनावरे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. १५ मे २०२१ ला सायखेड शिवारातच वन्यप्राण्याने एका गायीला ठार मारले होते. वन्यजीवांच्या मुक्तसंचारमूळे परीसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेत येथील साबू केदार यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई करून वन्यजीव विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वन्य प्राण्याच्या हल्ल्यात दोन मेंढ्या ठार; सहा बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 12:26 PM