सिंदखेड राजा: नाफेड अंतर्गत २०१७-१८ मध्ये खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांची तूर व हरभरा खरेदी करताना झालेल्या घोटाळ््याप्रकरणी आरोपींच्या अटकेसाठी सिंदखेड राजापोलिसांनी दोन पथके नियुक्त केली आहेत. दरम्यान, २४ जानेवारी रोजी ठाणेदार बळीराम गिते यांनी प्रत्यक्ष घटनास्थळ गाठून तेथील पंचनामा केला. दुसरीकडे या प्रकरणात खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक आणि संचालकांविरोधात २३ जानेवारी रोजी गुन्हे दाखल झाले होते. जवळपास शेतकऱ्यांच्या तूर व हरभरा खरेदीत ४६ लाख रुपयांच्या आसपास घोटाळा झाल्याचे चार सदस्यीय समितीने केलेल्या चौकशीत समोर आले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांनी २४ जानेवारीला खरेदी विक्री संस्थेमध्ये जावून घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, प्रकरणात फरार झालेल्या आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक संतोष नेमणार व पोलिस निरीक्षक रामेश्वर पारवे यांच्या नेतृत्त्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली आहेत. सध्या ही दोन्ही पथके प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या आरोपींचा शोध घेत आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर तथा आरोपींच्या अटकेसाठी दोन पथके गठीत झाल्यानंतर प्रकरणाशी संबंधीत अनेकांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, या खरेदी केंद्रावरील १२९ शेतकऱ्यांचे ७० लाख ८५ हजार रुपयांचे चुकारेही अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. यासंदर्भात आ. शशिकांत खेडेकर, खासदार प्रतापराव जाधव यांनी मंत्रालयीन स्तरावरून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
३० डिसेंबरला चौकशी अहवाल सादर
या प्रकरणात प्रभारी जिल्हा उपनिबंधक महेश कृपलानी यांनी चौकशी अहवाल सादर केला होता. त्यामध्ये जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे अधिकारी, केंद्र प्रमुख, खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख, व्यवस्थापक पवन पवार, संचालक प्रकाश कायंदे, रमेश किंगरे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणात आतापर्यंत चार आरोपींवरच गुन्हे दाखल झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. या प्रकरणातील अन्य दोषींवरही गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष मोरे यांनी केली आहे.