- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : उद्योग, व्यवसाय वाढीला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुद्रा’ योजनेंतर्गत आतापर्यंत ४०९ कोटी २१ लाख ७२ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. लॉकडाऊन काळातही सर्व व्यवहार ठप्प असताना अनेकांना मुद्रा लोणचा आधार झाला आहे. गेल्या तीन महिन्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील दोन हजार ८९ बेरोजगारांना मुद्रा योजनेतून १८ कोटी ३५ लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ मिळाले आहे.उद्योग आणि व्यवसाय वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने मुद्रा लोन योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात २०१६-१७ पासून राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकामधून या योजनेंतर्गत कर्ज वितरण करण्यात येत आहे. छोट्यात छोट्या आणि कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिकाला या योजनेंतर्गत कर्ज दिल्या जाते.मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अॅण्ड रिफायन्स एजन्सी अर्थात मुद्रा योजना ही शहरी व ग्रामीण भागातील कुठल्याही व्यक्तीला व्यवसायासाठी कर्ज वितरण करते. कारखानदार, कारागीर, फळ विक्रेता, दुकानदार, ट्रॅक्टर चालक, भाजीपाला विक्रेता यासह कोणत्याही प्रकारच्या व्यवसायासासाठी मुद्रा योजनेचे कर्ज उपलब्ध केले जाते. गत दोन वर्षापूर्वी या योजनेंतर्गत कर्ज वितरणाचे काम थंडबस्त्यात पडले होते. कर्ज परतफेड करण्याकडे लाभार्थ्यांचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम कर्ज वितरणावर मध्यंतरी झाल्याचे दिसून आले होते.परंतू आता लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील २ हजार ८० लाभार्थ्यांना बँकेकडून कर्ज देण्यात आले आहे. त्यामध्ये सुमारे १८ कोटी ३५ लाख १८ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे बेरोजगारांना नविन रोजगार उभारण्यास वाव मिळाला आहे. अडचणीच्या काळात ही योजना कामी पडल्याने अनेकांना आधार झाला. लॉकडाऊनच्या काळात दोन हजार बेरोजगांना मुद्रा लोणमुळे पाठबळ मिळाले आहे.चार वर्षात ५८ हजार लाभार्थ्यांना लाभ२०१६-१७ पासून मुद्रा योजनेंतर्गत कर्ज वितरण केल्या जाते. गेल्या चार वर्षामध्ये या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५८ हजार ५८१ लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये २०१६-१७ मध्ये ५ हजार २२६ लाभार्थी, २०१७-१८ मध्ये ८ हजार ४७१ लाभार्थी, २०१८-१९ मध्ये ९ हजार ११५, २०१९-२० मध्ये २५ हजार ७६९ लाभार्थ्यांना कर्ज देण्यात आले आहे. तर एप्रिल २०२० पासून आतापर्यंत २ हजार ८९ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.