मेहकर : मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बाेगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़. एकाच नावाचे दाेन मतदार मतदानासाठी आल्यानंतर हा प्रकार समाेर आला. या प्रकारामुळे मेहकरात खळबळ उडाली आहे. बनावट आधार कार्ड तयार करून मतदान करण्याचा प्रयत्न करण्यात आला़.
मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शिवाजी हायस्कूल येथील बूथ क्रमांक ७ वर मतदान प्रक्रिया सुरू हाेती. यावेळी मतदान यादीतील मतदान क्रमांक १४, अनिल देवबाप्पा आवटी यांच्या नावाने दुसराच मतदार मतदान करण्याच्या प्रयत्नात हाेता. तेथे खरे अनिल आवटी आल्यानंतर हा प्रकार समाेर आला. यावेळी तातडीने बाेगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तसेच त्याचे मतदान बाद करण्यात आले. त्यानंतर अनिल आवटी या मूळ मतदारास मतदानाची संधी देण्यात आली़ याविषयी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात आला आहे.
मतदान केंद्रावर उडाला हाेता गाेंधळ
एकाच नावाचे दाेन मतदार आल्याने मतदान केंद्रावर काही वेळ गाेंधळ उडाला हाेता. मात्र, पोलिस व संबंधित केंद्राध्यक्षांनी हस्तक्षेप करून बोगस केलेले मतदान रद्द केल्याने तसेच संबंधित व्यक्तीला पुन्हा मतदान करण्याची संधी दिल्याने गाेंधळ थांबला. व्यापारी आणि अडते मतदारसंघासाठी या केंद्रावर मतदान सुरू हाेते. या मतदारसंघात ९ उमेदवार रिंगणात असून, १५९ मतदार आहेत. तसेच मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून पी. टी. मडळकर, एम. एम. लोढे, एस. बी. काळे, जे. एम. चाकोते, आर. के. अवसरमोल यांनी काम पाहिले.