या अपघातामध्ये सुनील आत्माराम अंभोरे (रा. मेहकर), कारभारी रामभाऊ गवारे व त्यांची पत्नी सत्यभामा गवारे असे तिघेजण जखमी झाले आहेत. अंजनी खुर्द गावानजीक पश्चिमेच्या दिशेला हा अपघात झाला. एमएच २८-४८५१ क्रमांकाच्या दुचाकीवर मेहकर येथील सुनील आत्माराम अंभोरे हे मेहकरकडे जात होते. त्या दरम्यानच एमएच-२१-५९११ क्रमांकाच्या दुचाकीवर कारभारी गवारे व त्यांची पत्नी ही मेहकरकडून बिबी गावाच्या दिशेने जात होते. दरम्यान या दोन्ही दुचाकींची दुपारी ४ वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. त्यात तिघेही जखमी झाले. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच मेहकर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रभाकर सानप, निवृत्ती सानप आणि राजू जाधव यांनी त्वरित घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल करत मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी मेहकर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नव्हता.
दुचाकीची समोरासमोर धडक, तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:32 IST