मानेगाव (बुलढाणा) : शेतातील काम आटोपून घरी जाताना पूर्णा नदीच्या पुलावरील खड्ड्यातून दुचाकी घसरल्याने एक तरुण पुलावर, तर दुसरा पाण्यात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना नांदुरा-जळगाव जामोद रस्त्यावरील येरळी येथे रविवारी दुपारी दोन वाजता घडली. दोघेही येरळी येथीलच रहिवासी असून अविवाहित होते.
येरळी गावातील धनंजय मुकुंद (वय २६) व विलास जुनारे (२७) हे दोन्ही युवक गोळेगाव येथील शेतात कामासाठी गेले होते. दुपारी ते येरळी येथे परत येत होते. त्यावेळी गावालगतच्या जळगाव जामोद हद्दीतील पूर्णा नदीच्या जुन्या पुलावर असलेल्या खड्ड्यातून त्यांची दुचाकी घसरली. त्या अपघातात धनंजय हा पुलावरून नदीतील पाण्यात पडला, तर विलास पुलावरच पडल्याची माहिती आहे. अपघात झाल्यानंतर लगेच मानेगाव येथील तरुणांनी धनंजयला नदीपात्रातून बाहेर काढले. त्यावेळी तो बोलत होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. त्या दोघांनाही नांदुरा येथे दवाखान्यात नेण्यात आले.
मात्र, धनंजयचा रस्त्यातच मृत्यू झाला, तर विलासला खामगावातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दोघांचेही अजून लग्न झालेले नव्हते. तसेच त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. कुटुंबात वृद्ध आई, वडील आहेत. पुढील तपास जळगाव जामोद पोलिस ठाण्यातील हेकाँ मोहाडे करीत आहेत.
- रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले अनेक बळीनांदुरा-जळगाव जामोद रस्त्याने जुनी येरळी ते झाडेगाव दरम्यानच्या रस्त्यावर पाच-सहा ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्या खड्डयांमुळे अनेकांचे जीव जात आहेत. त्यावर कायमस्वरूपी उपाय करून त्वरित धोकादायक खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.