लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर धानोरा विटाळी नजीक वाहनाची धडक लागल्याने दुचाकी पुलावरून खाली पडली. ही घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजता घडली. या अपघातातखामगाव येथील पिता-पुत्र जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी मलकापूरकडून खामगावकडे जात असलेले राजेश रत्नपारखी (वय ५०) व त्यांचा मुलगा सागर रत्नपारखी (वय २८) रा. सिव्हील लाईन, खामगाव यांच्यादुचाकी क्र.एमएच२८-क्यु८९२२ ला वाहनाने धडक दिली. यामुळे धानोरा विटाळी ते काटी फाटा दरम्यानच्या पुलावरून सदर दुचाकी खाली कोसळली. यात दुचाकीस्वार पिता-पुत्रांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली असून सुदैवाने त्यांचे प्राण मात्र बचावले आहेत. घटनेची माहिती मिळताच धानोरा येथील भावेश गावंडे, रामराव नरवाडे, सुपेश पाटील, छगन दांडगे यांनी जखमींना वर काढून तात्काळ मलकापूर येथे खाजगी दवाखान्यात उपचारार्थ भरती केले.
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दोन महिन्यांपासून बंद असून सदर पुलाचे कठडे तुटलेले आहेत. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना कंत्राटदार कंपनीने केल्या नाहीत. यामुळे सदर अपघात घडला असल्याची चर्चा आहे. पुलाच्या नवीन अर्धवट बांधकामाच्या सळया (आसारी) उभ्या असून खामगाव येथील पितापुत्राचे दैव बलवत्तर असल्यानेच ते बचावले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (प्रतिनिधी)