मलकापूर (बुलढाणा) : सोने खरेदी करून पोथ गाठण्यास गेले असता दोन महिलांनी पिशवीमधील अंदाजे ३१ ग्रॅम सोने ठेवलेले पाकीट गायब केल्याची घटना १८ मार्च रोजी शहरात घडली होती. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून सुरू केलेल्या तपासात छत्रपती संभाजीनगर येथून दोन महिलांना अटक केली आहे.
शहरातील श्रीरामनगर भागातील सविता श्रीराम काकडे यांनी मलकापूर शहर ठाण्यात १८ मार्च रोजी तक्रार दिली होती. त्यामध्ये १७ मार्च रोजी दुपारी जुनी सोन्याची पोथ गाठण्यासाठी, तसेच नवीन सोने खरेदीसाठी शनी मंदिराजवळील एका ज्वेलर्स येथे गेले होते. त्यावेळी तेथून ४ ग्रॅम ६६० मिली व सोन्याचे पेंडन्ट ३ ग्रॅम १० मिली असे खरेदी केले. तसेच जवळ असलेली जुनी सोन्याची २४ ग्रॅम पोथ असे एकूण ३१ ग्रॅम ६७० मिली गाठण्यासाठी गेले. त्यावेळी दोन महिला त्यांच्या मागे आल्या, तसेच ज्वेलर्सच्या दुकानासमोरून नायलॉन पिशवीमध्ये ठेवलेले पाकीट पळविले. ही घटना सीसीटीव्ही कैद झाली होती. तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास मलकापूर शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर वर्गे करीत आहेत.
- तांत्रिक बाबींच्या आधारे केला तपास
पोलिसांनी गुन्ह्याचा योग्यरीत्या तपास करून तांत्रिक बाबींचा आधार घेत यातील आरोपी महिला अनिता पारलेस काळे (३४), रा. वाडीगोद्री, ता. अंबड जि. जालना, ज्योती सचदेव पवार (३२) रा. रामगव्हाण बु.नालेवाडी, ता. अंबड, जि. जालना यांना छत्रपती संभाजीनगर येथून ५ एप्रिल रोजी ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून आतापर्यंत २१ ग्रॅम ६१० मिली जप्त करण्यात आले. उर्वरित मुद्देमाल जमा होणे बाकी आहे. यातील दोनही महिला आरोपींना न्यायालयासमोर हजर केले. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.