विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मलकापूर (बुलढाणा): तालुक्यातील विवरा येथील दोन तरुणांचा पूर्णा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना श्री क्षेत्र धोपेश्वर येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. नदीच्या काठावर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे दोघे पोहण्यासाठी पात्रात उतरले होते हे स्पष्ट झाले आहे. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
तालुक्यातील श्री क्षेत्र धोपेश्वर येथील पुजारी पुंजाजी महाराज गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे स्नान करण्यासाठी गेले होते. त्यांना पूर्णेच्या काठावर दोन जणांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्या अनुषंगाने पोहेका राजेश बावणे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. स्थळ पंचनामा करीत असतांना नदीच्या घाटावर दुचाकी क्र.एम.एच.२८/बी.व्ही.३८१७ आढळून आली.
दोघांचे अंगावरील कपडे देखील काढून ठेवण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे दोघे पोहण्यासाठी पात्रात उतरले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी तपास केला असता दोघांची ओळख पटली आहे. त्यानुसार मृतकामध्ये सागर मधूकर कडू (वय ३३) व नंदकिशोर समाधान धांडे (वय ३७) दोघेही विवरा ता. मलकापूर यांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघेही बुधवारी दुपारी ४ वाजेनंतर पूर्णा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले होते. दोघांचाही बुडून मृत्यू झाला या घटनेत एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक हेमराज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका राजेश बावणे करीत आहेत.