देऊळगाव राजा(जि. बुलडाणा), दि. 0८- शेततळय़ात पोहताना दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ८ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील तुळजापूर शिवारात घडली. दरम्यान, वेळीच एका शेतकर्याने तळय़ात उडी घेऊन तिघांचे प्राण वाचविले.तालुक्यातील तुळजापूर गावातील दहा ते बारा मित्र दादाराव कोल्हे यांच्या शेतातील तळय़ात पोहण्यासाठी गेले होते. यापैकी पाच मुले शेततळ्यात पोहण्यासाठी उतरली. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास शेतात काम करीत असताना सुनील कोल्हे नामक शे तकर्याला मुलांचा वाचवा, वाचवा असा आवाज आला. त्यामुळे शेतकर्याने प्रसंगावधान राखून तळय़ाच्या दिशेने धाव घेतली, तर त्यांना मुले पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी शेततळय़ात उडी घेतली व पाण्यात बुडणार्या हर्षल रामचंद्र मगर, विशाल समाधान मगर, अनिकेत बाबासाहेब कांबळे, विनय राजेंद्र झिने, जयेश अरुण कांबळे या पाचही मुलांना पाण्याबाहेर काढले; मात्र हर्षल मगर (वय १७) व विशाल मगर (वय १५) या दोघा मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तुळजापूर गावात शोककळा पसरली आहे. हर्षल मगर हा सिंदखेड राजा येथे ११ वीमध्ये शिक्षण घेत होता, तर विशाल हा गावातीलच शाळेत शिक्षण घेत होता. हे दोघेही जण वडिलांना एकटेच होते. याबाबत सिंदखेड राजा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली. रात्री उशिरा दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेततळय़ात बुडून दोन युवकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2016 2:02 AM