लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कायमस्वरुपी शिक्षक मिळावा, या मागणीसाठी लोणार तालुक्यातील उदनापूर येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेमध्ये २० नोव्हेंबर रोजी शाळा भरवली. दरम्यान, ग्रामस्थांच्या या आंदोलनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लगोलग या शाळेला शिक्षक देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिका-यांना दिले. उदनापूर येथील जिल्हा परिषद शाळेला गेल्या तीन वर्षापासून कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने विद्यार्थांचे नुकसान होत आहे. याबाबत गावकरी , जि.प.शाळा व्यवस्थापन समिती यांनी लोणार पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचेकडे वारंवार मागणी केली. गटविकास अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी हा पवित्रा घेतला. परिणामी २० नोव्हेंबर रोजी शिवसेना नेते दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात पालकांनी बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारातच शाळा भरविली. याची दखल घेत मुख्याधिकारी षण्मुखराजन एस. यांनी उपरोक्त आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना दिले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी यावेळी उजळणी म्हणत जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला होता.सतत घटत चाललेली पटसंख्या आणि शिक्षणाचा दर्जा यामुळे जिल्हा परिषद शाळांवर अवकळा आलेली आहे. त्यात लोणार पंचायत समिती अंतर्गत असलेल्या उदनापूर जिल्हा परिषद शाळेत गेल्या तीन वषार्पासून एकच कायमस्वरूपी शिक्षक आहे. १ ते ५ वर्ग आणि ५६ पटसंख्या असलेल्या उदनापूर जि.प.शाळेत तीन पदे कायमस्वरूपी असताना याठिकाणी कायमस्वरुपी एकच शिक्षक आहे. दोन शिक्षक नसल्याने गावकºयांच्या आंदोलनामुळे अंशकालीन शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली होती. परंतु त्यांचा कार्यकाळ संपल्याने पुन्हा शिक्षकांची समस्या येथे निर्माण झाली. विद्यार्थांचे होणारे नुकसान पाहून गावकरी व शाळा समिती अध्यक्ष यांनी अनेकवेळा गटविकास अधिकाºयांकडे शिक्षकांची मागणी केली. पंरतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना गटविकास अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने अखेर गावकºयांनी शिवसेना नेते दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले. याची दखल घेत मुख्याधिकारी षण्मुखराजन एस. यांनी उदनापूर जि.प. शाळेला शिक्षक देण्याचे आदेश शिक्षणाधिकाºयांना दिले. सकाळपासून आलेल्या विद्यार्थांना प्रशासनाकडून साधी पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली नाही. यामुळे विद्यार्थांनी नळातून गळती होत असलेल्या पाण्यावरच आपली तहान भागविली. हे लक्षात येताच शिवसेना नेते दिलीप वाघ यांनी सर्व विद्यार्थांना पाणी व जेवणाची व्यवस्था केली हे विशेष!
‘शिक्षक द्या’!जिल्हा परिषद कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी उजळणी म्हणत जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला. अनेक अधिकारी, कर्मचारी कार्यालयासमोर भरलेल्या अनोख्या शाळेकडे बघतच राहिले. यावेळी ‘आमच्यावर गुन्हे दाखल करा, पण आमच्या मुलांच्या दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षक द्या’ एवढीच आमची मागणी असल्याचे पालकांनी सांगितले. लोणार पंचायत समिती अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. तसेच कायमस्वरूपी शिक्षक न मिळाल्यास सर्व विद्यार्थांचे शाळा सोडल्याचे दाखले एकाच दिवशी काढून खाजगी शाळेत टाकण्यात येतील.- दिलीप वाघ, शिवसेना नेते,लोणार.