लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव धाड : चुलीवर स्वयंपाक करताना गोरगरीब महिलांच्या डोळ्यातून येणारे पाणी व होणारा धुराचा त्रास थांबविण्यासाठी केंद्र शासनाने महिलांना उज्ज्वला योजनेंतर्गत माफक दरात गॅस दिला. मात्र, या बदल्यात रॉकेल बंद केले. आता मात्र गोरगरिबांना दरवाढीमुळे स्वयंपाकाचा गॅस परवडत नाही. त्यामुळे ‘उज्ज्वला’ने रॉकेल नेले, तर महागाईने गॅस हिरावला, असे म्हणण्याची वेळ ग्रामीण भागातील महिलांवर आली आहे.
शासनाच्या उज्ज्वला योजनेंतर्गत कमी दरामध्ये गोरगरीब महिलांना गॅसचे कनेक्शन दिले. आता गॅस दरवाढीमुळे गॅस सिलिंडरसाठी ९०० रुपये खर्च येतो. ग्रामीण भागामध्ये मजुरी करून पोट भरणे कठीण झाले आहे, त्यात वाढत्या महागाईमुळे ग्रामीण भागातील महिलांना ८९५ रुपयांचा गॅस भरणे परवडत नसल्याने चुलीवरच स्वयंपाक करण्याशिवाय पर्याय नाही. बऱ्यापैकी कमाई असणाऱ्या काही कुटुंबांमध्ये चहा व इतर छोट्या गोष्टी गॅसवर केल्या जातात, तर स्वयंपाक मात्र चुलीवरच केला जातो. तालुक्यात दारिद्र्यरेषेखालील व अल्पभूधारकांना शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन दिले. शिधापत्रिकेवर गॅसचा शिक्का मारत रॉकेल बंद केले. उज्ज्वला योजनेच्या मागे लागल्याने तालुक्यातील काही गावे रॉकेलमुक्त झाली आहेत. यात शासनाच्या अनुदानामुळे बचत होत असली, तरी ग्रामीण भागात रॉकेल मिळत नाही. वीज खंडित झाल्यानंतर ग्रामस्थांना व रात्रीच्या वेळेस शेतीची राखण करण्याकरिता जाणाऱ्या शेतकऱ्यांना रॉकेलच्या दिव्यांचा आधार होता. मात्र, तो आधारही शासनाने हिरावून घेतला आहे.