धामणगाव धाडः स्वयंपाक करताना गोरगरीब महिलांच्या डोळ्यातून येणारे पाणी केंद्र शासनाला बघवत नसल्याने, महिलांना उज्ज्वला योजनेंतर्गत माफक दरात गॅस दिले. बदल्यात रॉकेल बंद केले. आता मात्र गोरगरिबांना दरवाढीमुळे स्वयंपाकाचा गॅस परवडत नाही. उज्ज्वलाने रॉकेल नेले, तर महागाईने गॅस हिरावला, अशी वेळ ग्रामीण भागातील महिलांवर आलेली आहे.
शासनाच्या उज्ज्वला योजनेंतर्गत कमी दरामध्ये गोरगरीब महिलांना गॅसचे कनेक्शन दिले. आता गॅस दरवाढीमुळे गॅस भरण्यासाठी ९०० रुपये खर्च येतो. ग्रामीण भागांमध्ये मजुरी करून पोट भरणे कठीण झाले आहे, त्यात वाढती महागाई असल्याने ग्रामीण भागातील महिलांना ८९५ रुपयांचा गॅस भरणे परवडत नसल्याने चुलीवरच स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय नाही. बरी कमाई असणाऱ्या काही कुटुंबात चहा व इतर छोट्या गोष्टी गॅसवर केल्या जातात, तर स्वयंपाक मात्र चुलीवरच करीत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात दारिद्र्यरेषेखालील व अल्पभूधारकांना शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शनचे वितरण केले. शिधापत्रिकेवर गॅसचा शिक्का लावत रॉकेल बंद केले. उज्ज्वला योजनेच्या मागे लागल्याने, तालुक्यातील काही गावे रॉकेलमुक्त झाले आहेत. यात शासनाच्या अनुदानाची बचत असली, तरी ग्रामीण भागात रॉकेल मिळत नाही. वीज खंडित झाल्यानंतर ग्रामस्थांना व रात्रीच्या वेळेस शेतीची राखण करण्याकरिता जाणाऱ्या शेतकऱ्यांना रॉकेलच्या दिव्याचा आधार होता. मात्र, तो आधारही हिरावून घेतला आहे.