देऊळगावराजा : तालुक्यातील उंबरखेड येथील संजय खंडूजी कायंदे या ३२ वर्षीय युवकाचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. हा मृतदेह बसस्थानकाजवळील दुकान संकुलासमोर आढळून आला. दरम्यान, ए.एस.आय. संतोष गायकवाड यांनी हा खून नसून अपघात आहे, असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संतप्त नागरिकांनी, जोपर्यंत आरोपींना पकडत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेतल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.; मात्र वरिष्ठ अधिकार्यांनी मध्यस्थी केल्याने सायंकाळी मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देऊळगावराजा येथील बस स्थानकाजवळ संजय कायंदे या युवकाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. या दरम्यान ए.एस. आय. संतोष गायकवाड यांनी आपल्या मोबाइलवरून फोन करून इकडे वातावरण चिघळले आहे., तुम्ही दुकाने बंद करून फरार व्हा, अशा सूचना त्या भागातील अवैध व्यवसाय करणार्या लोकांना दिल्याने पोलिसांना खुनाचा तपास लागण्यापेक्षा अवैध धंदे करणार्या लोकांची काळजी असल्याचे लक्षात येताच, संतप्त जमावाने त्यांना जाब विचारला. याउपरही गायकवाड हे सभ्यपणाने न वागता हा खून नसून अपघात आहे, असे बेजबाबदारपणे वक्तव्य केल्याने जमाव पुन्हा संतप्त झाला आणि जोपर्यंत आरोपीला अटक करणार नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेतली. शेवटी वरिष्ठ अधिकार्यांनी मध्यस्थी केल्यानंतर युवकांवर उंबरखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
उंबरखेड येथील युवकाचा खून!
By admin | Published: January 28, 2016 12:22 AM