लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : विनाअनुदानित उच्च माध्य. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याची मागणी पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे. विनावेतन काम करण्याचा प्रवास संपावा व वेतन मिळावे, यासाठी १८ जुलै रोजी राज्यातील उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीने घेतला असून, त्यानुसार बुलडाणा येथे सदर आंदोलन करण्यात येणार आहे. आतापर्यंत कृती समितीच्यावतीने राज्याध्यक्ष प्रा.तानाजी नाईक यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली सनदशीर मार्गाने जवळपास दोनशे आंदोलने केली आहे; मात्र त्याची दखल आतापर्यंत शासनाने घेतलेली नाही, त्यामुळे २४ जुलैपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनाने निर्णय घेऊन राज्यातील विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळेच्या, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पात्र याद्या घोषित करुन १०० टक्के अनुदान देण्याची मागणी कृती समितीच्यावतीने केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून १८ जुलैला राज्यातील विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. या आंदोलनाला जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचा पाठिंबा आहे. त्या अनुषंगाने १८ जुलै रोजी एक दिवस जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे उपस्थित रहावे, असे आवाहन प्रा.गजानन निकम, प्रा.अमोल डुकरे, प्रा.सुखदेव सरदार यांनी केले आहे.
विनाअनुदानित शाळा आज बंद राहणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:43 AM