खामगाव : एकीकडे नगरपालिका पाणीबचतीचे प्रयत्न करुन सर्वत्र शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी धडपडत असली तरी दुसरीकडे मात्र अनधिकृत नळजोडणीमुळे लाखो लिटर पाण्याची चोरी होत आहे. या नळजोडणींची माहिती असूनही केवळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, अपुरे मनुष्यबळ, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कारवाईसाठी पालिका गंभीर नसल्याची माहिती समोर आली आहे. खामगाव शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, ती ९५ हजारापर्यंत गेली आहे. शहराला ज्ञानगंगा धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. वार्षिक २.९१ दलघमी पाण्याची नगरपालिकेची मागणी असते. शहरात १0 हजार अधिकृत नळधारक आहेत. या नळधारकांना वामन नगर व घाटपुरी येथे असलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून पाणीपुरवठा होतो. दररोज ६0 ते ६५ लाख लिटर पाण्याची गरज शहराला आहे. शहरातील पाणी वितरण व्यवस्था फार जुनी आहे; मात्र दिवसेंदिवस वाढणार्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढत आहे. सद्यस्थितीत शहरात पाचव्या दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. नळधारकाकडून वार्षिक पाणीपट्टीचे दर ठरविलेले असून, अर्धा इंची नळधारकाकडून १२00 रुपये, पाऊण इंची नळधारकाकडून दोन हजार तर एक इंची नळधारकाकडून चार हजार रुपये घेतले जातात. अनधिकृत नळजोडणींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अधिकृत नळजोडणीने पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे. पाईपलाईनच्याच नळाला थेट विद्युत मोटरी लावल्या जात असल्याने उच्चदाबामुळे पाणीपुरवठा एकीकडे ओढल्या जातो. परिणामी, शहरातील काही भागात पाणीटंचाई निर्माण होते.
अनधिकृत नळजोडणीने पळविले पाणी
By admin | Published: July 14, 2014 11:03 PM