देऊळगाव राजा : जगाच्या निर्मात्याने आपल्या पैगंबरावर अवतरित केलेल्या ईश्वरीय ग्रंथात जीवन जगण्याचा मार्ग दर्शविला आहे. मानवाला प्रकाशमान जीवन जगायचा असेल तर ईशग्रंथ पवित्र कुराण समजून घेतल्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. श्याम मुडे यांनी केले.
स्थानिक जमात-ए-इस्लामी हिंद शाखेच्यावतीने 'अंधारातून प्रकाशाकडे' या मोहिमेअंतर्गत कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. संतोष चित्रमंदिर चौकात प्रथम इस्लामिक मराठी पब्लिकेशन मुंबईच्या फिरत्या व्हॅनमधील पुस्तकालयाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगर उपाध्यक्ष पवन झोरे, राष्ट्रवादीच्या पालिका गटनेत्या सुनीताताई सवडे, प्रा. श्याम मुडे, शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. संघटनेचे शहराध्यक्ष शेख लुकमान यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात सर्व धर्म समाज बांधवांनी सहभाग नोंदविला. यशस्वीतेसाठी मोहम्मद अजिमोद्दिन, मोहम्मद सईद, फिरोज खान, नसीर खान पठाण, मुशीरखान कोटकर इस्लामिक मराठी पब्लिकेशनचे शेख मुसा, आदींनी पुढाकार घेतला.