बुलडाणा : बेराेजगारी, व्यसन आणि विवाहबाह्य संबंधांमुळे काैटुंबिक कलह वाढल्याचे चित्र आहे. तसेच एप्रिल २०२० ते डिसेंबर दरम्यान लावण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेकांचा राेजगार गेला. त्यामुळेही काही प्रमाणात वाद वाढले आहेत. भराेसा सेलमध्ये जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० दरम्यान ४४६ तक्रारी दाखल झाल्या आहेत.
गत काही वर्षांपासून विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे. त्यामुळे, पती, पत्नीवर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा दबावच राहिला नाही. त्यामुळे विवाहबाह्य संबध वाढले आहेत. आधी या बाबी लपवून ठेवल्या जात हाेत्या. मात्र, आता उघडपणे संबध पती किंवा पत्नी सांगण्यात येत आहेत. त्यामुळे काैटुंबिक कलहाचे हे कारण ठरत आहे. तसेच लाॅकडाऊनमुळे अनेकांचा राेजगार गेला. अनेक जण घरीच राहत असल्याने हिंसाचाराच्या घटनाही वाढल्या आहेत. पती, पत्नींमध्ये अहंकार आल्याने कुणीही माघार घेण्यास तयार नसल्याने वाद वाढतच जातात. क्षुल्लक कारणावरून घटस्फाेटापर्यंत प्रकरणे जात असल्याचे समाेर आले आहे. सन २०२० मध्ये भराेसा सेलमध्ये एकूण ४४६ प्रकरणे दाखल झाली हाेती. त्यापैकी १२६ प्रकरणे आपसात करण्यात भराेसा सेलला यश आले आहे. तसेच सन २०१९ मध्ये एकूण ३३६ तक्रारी दाखल झाल्या हाेत्या. त्यापैकी ८४ प्रकरणे आपसात करण्यात आली. तसेच काैटुंबिक हिंसाचार आणि काेर्ट समन्सच्या ६९ तक्रारी हाेत्या. २०१९ मध्ये ३३३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तीन प्रकरणांची चाैकशी सुरू आहे. सन २०२१ मध्येही दाेन महिन्यांतच ९४ तक्रारी दाखल झाल्या आहेत.
ही आहेत कारणे
पती किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबध, पती व्यसनाधीन असणे, पतीने दुसरे लग्न करणे आदींसारख्या कारणांमुळे काैटुंबिक कलह वाढले आहेत. अहंकार वाढल्याने पती, पत्नी चूक मान्य करायला तयारच नसतात. त्यामुळे, वाद वाढतच जाताे. काही प्रकरणांमध्ये पत्नी किंवा पतीच्या नाेतवाइकांचा अवास्तव हस्तक्षेपही वादास कारणीभूत ठरत आहे. विवाहाच्या वाढत्या वयामुळे आहे त्या परिस्थितीबराेबर जुळवून घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळेही वाद वाढत आहेत.
१२६ प्रकरणे आपसात
सन २०२० भराेसा सेलमध्ये ४४६ तक्रारी दाखल झाल्या हाेत्या. त्यापैकी १२६ प्रकरणांमध्ये पती, पत्नींमध्ये आपसात करून भराेसा सेलने निपटारा केला आहे. तसेच वर्षभरात ३८६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. २०१९ मध्ये ३३६ प्रकरणे दाखल झाली हाेती. ८४ प्रकरणे आपसात करण्यात आली. वर्षभरात ३३३ प्रकरणांचा निपटार करण्यात आला आहे. भराेसा सेलप्रमुख एपीआय अलका निकाळजे, हेकाँ अलका वाघमारे, किरण साबळे यांनी प्रकरणे आपसात करण्यासाठी परिश्रम घेतले.
बेराेजगारी, व्यसन,विवाहबाह्य संबंधामुळे काैटुंबिक कलह वाढले आहेत. नाेतवाइकांचा संसारात हस्तक्षेप, दुसरे लग्न, अहंकार आदींमुळेही वाद वाढत आहेत. गेल्या वर्षी १२६ प्रकरणे आपसात केली आहेत. तसेच ३८६ प्रकरणांचा भराेसा सेलने निपटारा केला आहे. लाॅकडाऊनमुळे बुलडाणा जिल्ह्यात काैटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढलेल्या नाहीत. दरवर्षीप्रमाणेच तक्रारी दाखल झाल्या आहेत.
अलका निकाळजे, भराेसा सेल प्रमुख, बुलडाणा