जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदात्यांचा ३० जून रोजी सत्कार करण्यात आला. त्या वेळी गणेश श्रीवास्तव यांचाही सत्कार करण्यात आला. त्यानिमित्ताने त्यांच्याशी चर्चा करताना त्यांच्यामधील ‘बी पॉझिटिव्ह’ दृष्टिकोन स्पष्टपणे जाणवला आणि विशेष म्हणजे त्यांचा रक्तगटही बी पॉझिटिव्ह आहे, हा एक निव्वळ योगायोग म्हणावा लागेल.
२०१२-१३ दरम्यान अडीच महिन्यांनंतर रक्तदान करता येते, असा नियम होता. त्यानुषंगाने त्या काळात गणेश श्रीवास्तव यांनी एका वर्षात पाच वेळा रक्तदान केले आहे.
सध्या तीन महिन्यांनंतर रक्तदान करण्याचा नियम आहे. त्यामुळे आता त्यांनी वर्षातील चार वेळा रक्तदान करण्याची तारीखही निश्चित केलेली आहे. विशेष म्हणजे १९९५ मध्ये ज्या वेळी पहिल्यांदा त्यांनी रक्तदान केले ती २३ जानेवारी १९९५ ची तारीखही त्यांच्या आज पक्की लक्षात आहे.
--सहकारीही नियमित रक्तदान करणारे--
शहरातील एक व्यावसायिक म्हणून ओळखले जाणारे गणेश श्रीवास्तव यांचे सहकारीही नियमित रक्तदान करतात. यामध्ये प्रामुख्याने अजय चव्हाण, ऋषीकेश शर्मा, जयसिंग श्रीवास्तव, नितीन श्रीवास्तव, मुकुंद वैष्णव, अजित गुळवे या सहकाऱ्यांचा यात समावेश आहे.
--रक्तदान जीवनदान--
रक्तदान करणे एक प्रकारे जीवनदानच आहे. आतापर्यंत ९२ वेळा रक्तदान केले आहे. गेल्या १५ ते २० वर्षांत कधीही आजारी पडलेलो नाही. ‘लोकमत’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत रक्ताच नातं’ या उपक्रमात आपणही सक्रिय सहभाग घेऊन रक्तदान करा.
- गणेश श्रीवास्तव, रक्तदाता, बुलडाणा