चिखली काँग्रेसच्यावतीने २३ जानेवारी रोजी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार यशोमती ठाकूर व अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आ. राहुल बोंद्रे होते. तर आ. राजेश एकडे, जि. प. अध्यक्षा मनीषा पवार, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती ढोकणे, जि. प. सभापती ज्योती पडघान यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात राहुल बोंद्रेंनी बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांना भरसभेत उभे करून ते काँग्रेस समर्थक असल्याचे वदवून घेत त्या गावातील भाजपतर्फे करण्यात आलेला विजयाचा दावा फोल ठरविला. मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत ८० टक्के सदस्य निवडून आल्याचा भाजपच्या दाव्याचा समाचार घेताना खोर, चांधई, अंचरवाडी, मलगी, पळसखेड, मालगणी, पळसखेड भट या अविरोध निवडून आलेल्या ग्रा.प. सदस्यांना उभे करून तर म्हसला बु., रायपूर, पळसखेड दौलत, भोरसा भोरसी आणि हारणी या गावातील नवनिर्वाचित सदस्यांना उभे करून ही गावे भाजपबरोबर असल्याचा दावा खोडून काढला. सूत्रसंचालन गणेश शेळके, आभार डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी मानले. यावेळी महाविकास आघाडीचे पदधिकारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
ग्रामपंचायत ही ग्रामविकासाची गुरुकिल्ली - शिंगणे
ग्रामपंचायत ही ग्रामीण विकासाची गुरुकिल्ली असून याचा सुयोग्य उपयोग करून गावाचा विकास साधावा. त्यामुळे तुमचा उत्साह कायम ठेवा, गावाचा विकास साधा, असे आवाहन यावेळी पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.
२१ लाखांची घोषणाही हवेतच विरणार का : राहुल बोंद्रे
राहुल बोंद्रेंनी विरोधकांवर हल्ला चढविताना भाजप आमदारांवर खरमरीत टीका केली. आमदारांनी बिनविरोध ग्रामपंचायतींना २१ लक्ष निधी देण्याची घोषणा केली आहे. मात्र, भाजपचा सरपंच असावा असा आग्रह धरला आहे. २१ लक्ष रुपयांची घोषणाही हवेतच विरणार का, असा प्रश्न उपस्थित केला.