बुलढाणा: जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असून कधी एखाद्या मंडळात तर कधी एखाद्या तालुक्यात या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि.१२) मोताळा, खामगाव आणि मेहकर तालुक्यातील काही गाव परिसरामध्ये अवकाळी पावसासह लिंबाच्या आकाराच्या गारी पडल्या. मोताळा तालुक्यात खरबडी शिवारात पोकलेनवर काम करणाऱ्या बिहार राज्यातील २० वर्षाच्या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला तर सुनील वामन दळवी हा जखमी झाला आहे.
जखमी सुनील वामन दळवी यांच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. वीज पडून मृत्यू पावलेला युवकाचे नाव संजीव उमेश मंडळ असे आहे. दुसरीकडे खामगाव तालुक्यातील लाखनवाडा बुद्रुक परिसरातही वीज पडून गजानन वाघ यांच्या मालकीचा एका बैलाचा मृत्यू झाला आहे. मेहकर तालुक्यात डोणगाव, मादणीसह लगतच्या पट्ट्यात गारपीट झाली आहे. प्राथमिक स्तरावर नुकसान कमी दिसत असले तरी त्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे.
प्राथमिक अंदाजानुसार मोताळा तालुक्यात २३ गावांमधील ४५० हेक्टरवर, देऊळगाव राजा तालुक्यातील सहा गावातील ८६ शेतकऱ्यांचे गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. मोताळा तालुक्या त डाबा परिसरात तर अवकाळी पावसामुळे नदीला पुर आला होता. त्यामुळे मोताळा ते खरबडी मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.